नवी मुंबई : प्रतिनिधी
साहित्यिक अमृत पाटील नेरूळकर लिखित इतिहास नवी मुंबईचा हे नवी मुंबईची इत्यंभूत माहिती देणारे ऐतिहासिक पुस्तक असून भावी पिढीला प्रेरणादायी आहे. हे पुस्तक मला मनापासून आवडल्याची भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे व्यक्त केली. नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती यांनी इतिहास नवी मुंबईचा हे ऐतिहासिक पुस्तक भगत सिंह कोश्यारी यांना भेट म्हणून दिले या वेळी ते बोलत होते. अमृत पाटील-नेरूळकर यांनी लिहिलेल्या भगत सिंह कोश्यारी: एक समर्पित जीवन या काव्याचे वाचनही या वेळी करण्यात आले. या काव्याने शेती, शाळा, घर, शालेय जीवन, विद्यार्थी संघ, अध्यापनाचे काम, पत्रकारिता, आणीबाणीचा काळ अशा सार्या आठवणी जागृत केल्याचे सांगत भगतसिंह कोश्यारी यांनी अमृत पाटील यांच्या या काव्यास उत्स्फूर्त दाद दिली.ऐतिहासिक पुस्तके जुन्या आठवणींना उजाळा देतात. इतिहास नवी मुंबईचा या पुस्तकानेही आताच्या नवी मुंबईतील म्हणजेच पूर्वीच्या साष्टीतील पेशवे, पोर्तुगीज व इंग्रज कालीन घटना घडामोडींना उजाळा दिला असल्याचे शेवटी भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. या वेळी पत्रकार अंकुश वैती, सामाजिक कार्यकर्ते, डॉ. के. एस. पनवर, गजानन दळवी, किशोर घोटकर, सिद्धांत वैती आदी उपस्थित होते.