पाली : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनवण्यात आली आहेत. सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड हे यामधील एक स्वप्नातील गाव. फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या गावाची स्वप्नातील गाव म्हणून घोषणा केली. स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रुवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, तहसीलदार दिलीप रायन्नावर, गटविकास अधिकारी अशोक महामुनी, पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, माजी सभापती पी. डी. डूमना, राज आश्रमचे हितेशभाई मेहता व सरपंच पारुताई चौधरी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी गीत व नृत्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी गावातील विविध विकासकामांचे सादरीकरण केले. सर्व पाहुण्यांनी गावांमधील विकासकामांना भेटी दिल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांच्याकडून शोष खड्ड्यांविषयी अधिक माहिती जाणून घेतली व गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. या वेळी सोनाली कुलकर्णी, झरीना स्क्रूवाला व मंगेश वांगे यांच्या हस्ते गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. एका वर्षामध्ये तांबडमाळ-चिंबोड गावांमध्ये झालेला बदल हा अतुलनीय आहे, इतर गावांनी तांबडमाळ चिंबोड गावापासून आदर्श घ्यावा व आपले गावही स्वप्नातील गाव बनवावे, असे आवाहन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी केले. तहसीलदार दिलीप रायान्नावार यांनी गाव विकास समिती व स्वदेस फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करून पुढील टप्प्यामध्ये गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा व अधिकारी बनावे, अशी इच्छा व्यक्त केली. सोनाली कुलकर्णी, झरीना स्क्रूवाला, पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. गाव विकास समितीतील सदस्यांनी आदर्श गावाचा प्रवास कसा होता, या विषयीचे अनुभव सांगितले. सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष योगेश मोरे, ग्रामसेवक सुनील पानसरे, पोलीस पाटील वामन सुतक, फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, सहव्यवस्थापक समिर शेख, सुश्मिता मूर्ती, समन्वयक श्रीधर कोकरे, किरण शिंदे आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
…असे घडले स्वप्नातील गाव
स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली तांबडमाळ-चिंबोड गावात दोन वर्षांपूर्वी गाव विकास समिती स्थापन करण्यात आली होती. ही गाव विकास समिती तसेच स्वदेस फाउंडेशन व शासन यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून तांबडमाळ-चिंबोड गावात हरित क्रांती, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारी मुक्त गाव, शासकीय पेन्शन, शासकीय मूळ कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचत गट, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, घरकुल योजना, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, सौर पथदिवे, 100 टक्के कुटुंबांना सौरऊर्जा सर्व कुटुंबांचा आरोग्य विमा अशा अनेक उपक्रमातून स्वप्नातील गाव घडले.