काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल
चंद्रपूर : प्रतिनिधी
’माझे पक्षात कुणी ऐकत नाही, मीच राजीनाम्याच्या विचारात आहे’, असे वक्तव्य असलेली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची ऑडिओ क्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपण हे बोललो आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले नसले तरी या संभाषणाचा त्यांनी इन्कारही केलेला नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतभेद असून, याबाबत आपले मत उघड करणार्या एका काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना चव्हाण यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ क्लिपबाबत बोलताना अशोक चव्हाण एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की, त्या कार्यकर्त्याशी झालेले ते माझे खासगी संभाषण आहे. ते संभाषण सार्वजनिक करणे चुकीचे आहे. तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. माझ्याशी बोलणारी व्यक्ती ही काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता होती. त्याचे मनोबल राखणे हे माझे काम आहे. मी ती क्लिप ऐकलेली नाही. ती क्लिप असली तरीदेखील चंद्रपूरमध्ये अनेक वादाचे विषय आहेत हे मान्य करायलाच हवे. चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेला वाद मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातला आहे, मात्र जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामुळे चव्हाण पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसने रात्री उशिरा 35 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राज्यातील पाच नावांचा समावेश आहे. काँग्रेसने या यादीत चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीसाठीही पक्षातून जोरदार प्रयत्न केले जात होते. शिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे चंद्रपूरमधून शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही होते.
दरम्यान, महाआघाडीकडून महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस 24; तर राष्ट्रवादी 20 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन विकास आघाडीला 1 जागा, स्वाभिमानीला 2 जागा, तर युवा स्वाभिमानी पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील गैरहजर होते. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
काँग्रेसचे अब्दुल सत्तार अपक्ष लढणार
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्याच पक्षाचे आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. झांबड यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा सत्तार यांचा दावा आहे.
लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करीत होतो. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. इतके करूनही पक्षाने मला डावलले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.