मुख्यमंत्र्यांना ‘अभाविप’चे निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) इमारत पालिकेने 2015 साली धोकादायक जाहीर केली असताना गेली सात वर्षे विद्यार्थी याच इमारतीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. अशीच अवस्था त्याच्या बाजूला असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची आहे. या दोन्हीही शैक्षणिक वास्तू नव्याने बांधण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, अभाविपचे पनवेल महानगरमंत्री मयुर साबळे, सहमंत्री श्रेयस मांडगे आदी उपस्थित होते.
अभाविपने पनवेल आयटीआयच्या दूरवस्थेबाबत मागील दोन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन कौशल्य विकासचे सचिव कुशवाह यांना दिले होते. त्याचप्रमाणे अभाविप याबाबत प्राचार्य, जिल्हाधिकारी यांना भेटून या विषयाचा पाठपुरावा करीत आहे, पण कामात कुठल्याही प्रकारची प्रगती दिसत नाही.
अशीच अवस्था शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची असून गेली सहा वर्ष हे वसतिगृह बंद आहे. मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात मुलांची व्यवस्था केलेली आहे, तर मुलांच्या वसतिगृहात उच्च शिक्षण सहसंचालकांचे कार्यालय आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही.
या सर्व दूरवस्थेबद्दल अभाविपच्या शिष्टमंडळाने पनवेल येथे नुकतेच आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि आयटीआय कॉलेजची इमारत व बीएड कॉलेजचे वसतिगृह नवीन बांधण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या इमारती नव्याने बांधण्यात येतील, असे आश्वासन दिले.