म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा शहर तसेच गौळवाडी, सावर, खारगाव (बु) परिसरांत सोमवारी (दि. 3) पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. या दाट धुक्यामुळे सूर्य किरणेही जमिनीवर उशिरानेच पोहोचली. मागील काही दिवसांपासून सकाळच्या वातावरणात गारठा वाढला असून नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. नवरात्रांत दुर्गादेवी विविध रुपे घेते, त्याचप्रमाणे निर्सगही वेगवेगळी रुपे घेतो, असे जाणकार नेहमीच सांगत असतात. त्याची प्रचिती म्हसळ्यातील नागरिकांना येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दुपारी उन्हाचे चटके बसतात, सायंकाळी 4 ते 7 या वेळेत ढग जमतात, कधी विजांच्या कडकडाटसह पाऊस पडतो. हवामानात गारवा येतो. सोमवारी पहाटेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत म्हसळा शहर, गौळवाडी, सावर, खारगाव (बु.) परिसरांत धुक्याची चादर पसरली होती. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तपमानात चढ-उतार अनुभवास येणार आहे. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे. या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरांत आणि तालुक्यांत खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असले तरी, अनेक महिन्यांनी अनुभवायला मिळालेल्या धुक्याचा आनंद नागरिकांना आल्हाददायकच वाटत आहे.