खोपोली : प्रतिनिधी
वीजवितरण कंपनीकडून मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद करून खोपोली शहरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. यात विजेचे खांब व वीजवाहिनींना खेटलेली झाडी छटाई, वीजवाहिनी दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. मात्र खोपोली हद्दीत महामार्गाच्या बाजूच्या वीज वाहिन्यांखालील झाडांची छटाई करतांना तोडलेल्या फांद्या महामार्गावर टाकण्यात आल्याने वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होऊन, येथे काही तास वाहतूककोंडी निर्माण झाली होती. वाहतूककोंडीमुळे परिस्थिती बिकट झाल्यानंतर खोपोली पोलीस व अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन वीजवितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिली व फांद्या इतरत्र हलवून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.
झाडांच्या फांद्या छाटून ठेकेदाराने त्या रस्त्यात टाकल्या होत्या. वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या या फांद्या तत्काळ उचलण्याचे निर्देश संबधित कर्मचारी व ठेकेदाराला दिले होते. मात्र दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी झाल्याने जेसीबी जाण्यास अडचण आल्याने ही समस्या निर्माण झाली. काही वेळात मात्र महामार्ग मोकळा करण्यात आला.
-बालाजी छात्रे, अभियंता, वीजवितरण कंपनी खोपोली