अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील खानाव- वेलवली रस्त्यावर मंगळवारी (दि. 14) गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. टँकरमध्ये 18 टन गॅस होता. सुदैवाने वायूगळती न झाल्याने मोठी हानी टळली. या अघातात टँकरचा चालक भरत प्रभाकर धनवे (वय 30, रा. चेंबूर) जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भरत धनवे मुंबईहून गॅस भरलेला टँकर घेऊन अलिबाग तालुक्यातील खानाव येथील एचपीसीएल कंपनीत चालला होता. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टँकर खानाव-वेलवली रस्त्यावर आला असता त्याचा टँकरवरील ताबा सूटला. टँकर रस्त्याच्याकडेला पलटी झाला. गॅसचा टँकर पलटी झाल्याची बातमी परिसरात पसरली. या अपघातामुळे अलिबाग-वावे मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण होते. अपघात झाल्याचे समजताच एचपीसीएल कंपनीचे अधिकारी, रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरची पाहणी केली असता वायुगळती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.