अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडाव्यात या मागणीसाठी वरसोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 8) महावितरणच्या चेंढरे येथील कार्यालयात जाऊन तेथील अभियंत्यांना घेराव घातला.
वरसोली या ग्रामपंचायत हद्दीतील विद्यूत सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे दोन कर्मचारी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या दोन कर्मचार्यांच्या भरोशावर महावितरणचे कामकाज सुरु होते. मात्र काही दिवसांपूर्वी या दोन्ही कर्मचार्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अन्य कर्मचारी नियुक्त न केल्याने वरसोली परिसरातील वीजपुरवठ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात विद्युत कर्मचारी उपलब्ध नसल्याने गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह सदस्यांनी बुधवारी चेंढरे येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय गाठले.
वरसोली हद्दीत महावितरण कर्मचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी देण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता सादेकपाशा इनामदार यांनी दिले. सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, सदस्य सुरेश घरत, हर्षल नाईक, संध्या खोत, नमिता माळवी, प्रियंका गुंजाळ, साधना तांडेल, संजीवनी कवळे आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.