रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील लांढर येथील जंगलातील रानडुकराच्या शिकारीची माहिती रोहा वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांना लागताच त्यांनी उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 15)सापळा रचून शिकार्यांना ताब्यात घेऊन व मुद्देमाल हस्तगत केला. रोहा वनपाल संजय चव्हाण, गोफण वनपाल निलेश वाघमारे, रोहा वनरक्षक विकास राजपूत, ताम्हणशेत वनरक्षक वैभव बत्तासे, वावेपोटगे वनरक्षक निखिल पाटील, वनमजूर मोरेश्वर भगत यांनी लांढर येथील जंगल भागात ही कारवाई केली. रोहा वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लांढर येथील जंगलात फिरती पाहणी करत असताना चार इसम दोन दुचाकी वाहनांवरून जाताना आढळून आले. त्यांना रोखले असता त्यातील तीन व्यक्ती पसार झाल्या. तर महादेव कुशा पिंगळा याला पकडण्यात वनविभागाला यश आले. या वेळी दोन बॅगा व ब्लँकेटमध्ये बांधून आणलेले रानडुकराचे मास व वाहतूकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन होंडाशाईन दुचाकी (एमएच-06,बीटी-6605 आणि एमएच-06,सीइ-8897) व हत्यारे जप्त करण्यात आली. या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,50,51 व भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26(1) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती रोहा वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांनी दिली.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …