Breaking News

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची, तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची मंगळवारी (दि. 10) बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने अखेरीस त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले.
भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती, तर यापूर्वीच सार्वत्रिक निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने महापौर, उपमहापौर निवडणुकीतसुद्धा नाचक्की होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडे अर्ज मागे घेण्यावाचून पर्याय शिल्लक राहिला नव्हता. निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
या निवडीनंतर पनवेल शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि ’एकच वादा प्रशांतदादा’ अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजप महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह पनवेल महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली.
नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील आणि उपमहापौर प्रमिला पाटील यांनी पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या वेळी बोलताना महापौर नितीन पाटील यांनी, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर देण्यात येईल. त्याचप्रमाणे नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील, असे नमूद केले. या संपूर्ण विजयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि समस्त मतदार पनवेलकरांचे मनःपूर्वक आभार मानले, तर सर्वांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महापौर नितीन पाटील यांना आदराने ’भाई’ म्हणून संबोधले जाते. पनवेल तालुक्यातील कासारभाट त्यांचे मूळ गाव. सामाजिक कार्य चालवत पुढे त्यांनी राजकारणात पदार्पण केले. दोन वेळा नगरसेवक म्हणून जबाबदारीने काम केले. सभागृहातील त्यांचा अनुभव, विषयांची सखोल मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क व्यापक व मजबूत असून ते नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तत्पर असतात. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पनवेल विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक प्रमुख म्हणून केलेले नियोजन, समन्वय आणि नेतृत्व पक्षाच्या यशात महत्त्वाचे ठरले आहे.
सामाजिक कार्याची आवड असल्याने नितीन पाटील हे सुरुवातीपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहेत. अभिनव मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच जाणीव या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे ते राबवतात. सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर महापौरपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून आगरी समाजाचा पहिला महापौर म्हणून त्यांनी सन्मान मिळविला आहे.
उपमहापौर प्रमिला पाटील या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतिभूमी शिरढोण गावाची लेक आहेत. भाजप कळंबोली मंडळाच्या खजिनदार व सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या पाटील यांनी आपल्या कार्यातून कळंबोलीच्या राजकारणात ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक-सामाजिक सबलीकरण करत त्यांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळात पोहचवल्या. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7, 8 व 9मधून भाजप महायुतीचे 12पैकी 12 उमेदवार विजयी झाले. प्रभाग 7मधून प्रमिला पाटील यांनी विद्या गायकवाड यांचा पराभव केला. सामाजिक कार्य व संघटन कौशल्यामुळे त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे.
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाचा धक्का सावरत नाही, तोच जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीतही शेकापप्रणित महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत पनवेल पंचायत समितीमध्येही शेकापचे अस्तित्व संपुष्टात आले. एक अर्थाने जनतेने शेकापला सपशेल नाकारले आहे. त्याचा उत्साह मंगळवारी झालेल्या भाजप महायुतीच्या रॅलीतील जल्लोषातून दिसून आला.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply