कर्जत : विजय मांडे
मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे सेनेचा अर्थात युतीचा बालेकिल्ला. 2009 मध्ये हा मतदार संघ अस्तित्वात आला आणि त्यांनतर झालेल्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे खासदार लोकसभेत गेले. मात्र पवार कुटुंबातील पार्थ यांच्या उमेदवारीमुळे यंदा या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असले तरी हा मतदार संघ म्हणजे महायुतीच्या बालेकिल्ल्यात पवारांची ’कसोटी’ आहे.
2009 मध्ये अस्तित्वात आलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात घाटा खालील पनवेल, उरण, कर्जत आणि घाटा वरील मावळ, पिंपरी, चिंचवड या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघाचा पहिला खासदार होण्याचा मान शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे यांचा पराभव करून मिळविला होता. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी शेकापच्या लक्ष्मण जगताप यांना पराभूत करून विजय मिळविला होता. त्यावेळी आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे राष्ट्वादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर तिसर्या स्थानावर फेकले गेले. पहिल्यांदाच लोकसभेत गेलेल्या खासदार बारणे यांनी सलग पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळवून आपला वेगळाच ठसा उमटविला आहे.
मागील दोन्ही पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागले असल्याने त्यांनी पार्थ अजित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपले सर्वस्व पणाला लावले आहे. खासदार म्हणून आपला ठसा उमटविलेले श्रीरंग बारणे पुन्हा एकदा मावळमधील महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोर पवारांची प्रतिष्ठा पार्थ यांच्या रूपाने पणाला लागली आहे. मागील वेळी बारणे आणि जगताप यांच्यात लढत झाली होती. यावेळी त्या दोघांचे मनोमिलन झाल्याने पवारांच्या गोटातील धाकधूक वाढली आहे. पार्थ पवारांच्या प्रचारासाठी आजोबा शरद पवारांसह सारेच उतरले आहेत.
या लोकसभा मतदार संघात एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत बारणे आणि पार्थ पवार यांच्यात आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान व्हावेत, यासाठी बारणे यांच्या विजयाकरीता पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत तर शिवसैनिकही खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी चांगलेच प्रयत्नशील झाले आहेत.