पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यकलेतील विविध पैलूंवरील मास्टर क्लास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले.
या वेळी अभिनेते मोने यांनी भाषणात सांगितले की, अभिनय ही केवळ शिकवून येणारी गोष्ट नाही, तर ती उपजत असावी लागते, मात्र जर तुम्हाला भविष्यात समाजाचे नेतृत्व करायचे असेल, तर तुमच्या अंगी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अभिनय असणे अत्यंत गरजेचे आहे. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साहित्य हा समाजजीवनाचा आरसा आहे. अभिनयाची गरज जशी कामासाठी असते, तशीच ती एक आवड म्हणूनही जोपासायला हवी. ज्याच्याकडे अभिनयाचे कौशल्य आहे, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो; कारण आज प्रत्येक क्षेत्रात प्रभावी सादरीकरणासाठी अभिनयाची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन केले.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही मार्गदर्शन करत, जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला अभिनयाची गरज असते. एखादी गोष्ट योग्य पद्धतीने सादर करता येणे आणि ती प्रभावीपणे व्यक्त करता येणे, हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला जनार्दन शिक्षण प्रसार संस्थेचे वाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, संस्कृती विभागाच्या प्रमुख डॉक्टर गीताका तंवर, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पनवेलचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, अमोल खेर, चिन्मय समेळ, वैभव बुवा आदी उपस्थित होते.
दोन दिवस चालणार्या या कार्यशाळेमध्ये संजय मोने, अभिजीत झुंजारराव, प्रमोद शेलार, विशाल कदम या मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना लाभणार आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेतील सी. के ठाकूर महाविद्यालय, सी. के. ठाकूर ज्युनिअर कॉलेज, भागुबाई चांगु ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स खारघरमधील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय मोने यांनी अभिनयातील बारकाव्यांवर प्रकाश टाकत म्हाणले की, अभिनयासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, कोणत्याही वयात व्यक्ती स्वतःमधील कलाकार जागा करू शकते. बदलत्या काळात संवादकौशल्य आणि सादरीकरण या गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले असून, नेतृत्व करणार्या व्यक्तीला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनयाची जोड मिळाल्यास त्याचे कार्य अधिक प्रभावी ठरते. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी तरुण पिढीने कलेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यक्तिमत्व विकासाचे साधन म्हणून पहावे, असा सल्ला दिला.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper