सुदैवाने जीवितहानी टळली
कर्जत : प्रतिनिधी
माथेरानला जातानाच घाट रस्त्यात अपघात होऊन त्यांच्या रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे. यात दोघेही बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई विरार येथील विजय उपाध्ये व आशिष चतुर्वेदी या दोन मित्रांनी माथेरान येथे सुट्टी घालवण्याचा बेत आखला. त्यानुसार ते सकाळी मुंबई येथून आपली इर्टिगा गाडी क्रमांक एमएच 48 सिसी 8439 घेऊन निघाले. माथेरान येथे घाटरस्ता सुरू झाल्यानंतर तो त्यांना जरासा अवघड वाटला मात्र चालक विजय उपाध्ये हे सावकाश गाडी चालवत होते. अशात 11 वाजण्याच्या सुमारास माथेरान वॉटर पाईप स्टेशनच्या पुढच्या वळणावर समोरून येणार्या अज्ञात वाहनाने विजय याचा गाडीवरचा ताबा गेला आणि गाडी कठड्यावरून थेट उभी खाली कोसळली. दोघांनीही सीटबेल्ट लावले असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
गाडी पडल्याचे पाहताच रस्त्यावरील माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या चालकांनी त्यांना मदत केली आणि नेरळ पोलिसांना देखील याबाबत कळवले. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, पोलिस हवालदार घनश्याम पालवे, हे तत्काळ हजर होत त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करून पुढील कारवाई केली.
सीट बेल्टमुळे वाचलो
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाची मात्र पुरती दुर्दशा झाली होती. तर आम्ही केवळ सीट बेल्ट मुळे वाचलो, असे देखील वाहनचालक विजय याने सांगितले.