Breaking News

धुळीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळणार!

माथेरानच्या व्यापारी वर्गात समाधान; क्ले पेव्हर ब्लॉक रस्ता काम युध्दपातळीवर

माथेरान : रामप्रहर वृत्त

माथेरानमध्ये धूळ विरहित रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा याकामी सनियंत्रण समितीच्या परवानगीने एमएमआरडीएच्या माध्यमातून क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे सध्यातरी युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामामुळे माथेरानच्या व्यापारी, नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या कामामुळे धुळीच्या दुष्परिणामापासून मुक्तता मिळणार असल्याने व्यापार्‍यांचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.

मुख्य रस्ता असणार्‍या महात्मा गांधी मार्गावर व्यापारी, दुकानदार तसेच लहान मोठे रेस्टॉरंट खाद्यगृहे, स्टॉल धारकांची असंख्य दुकाने आहेत. या मार्गावर सतत रहदारी असल्यामुळे येथील मातीच्या रस्त्यातून चालताना पर्यटकांसह नागरिकांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याच धुळीमुळे व्यापारी वर्गाच्या दुकानातील मालाचे प्रचंड नुकसान होत असे. परंतु या धूळ विरहित रस्त्यांसाठी क्ले पेव्हर ब्लॉकचा एकमेव उपाय सनियंत्रण समितीने सांगितल्यावर याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून माथेरानचे प्रवेशद्वार असणार्‍या दस्तुरी नाक्यापासून ते पांडे रोडपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज रोड येथील रहिवाशांच्या मागणीनुसार वन ट्री हिल विभागापर्यंत क्ले पेव्हर रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळेच सद्यस्थितीत ही कामे वेगाने सुरू केली आहेत.

माथेरान सारख्या या दुर्गम भागात अशाप्रकारे भरीव निधी लवकर उपलब्ध होऊ शकत नाही. या कामांत  विघ्न आणणारी काही मंडळी नेहमीच तत्पर  असतात. त्यांनाही ठाऊक आहे की एवढा निधी इकडे लवकर मिळू शकत नाही. परंतु विनाकारण प्रत्येक कामात अडथळा निर्माण करण्यासाठी विघ्नसंतोषी राजकीय मंडळी कुणालाही गळाला लावून विकास कामाला अडसर आणण्यासाठी आपली विरोधाची भूमिका अप्रत्यक्षपणे पार पाडत असतात. त्यामुळेच ठेकेदारांना सर्वांच्या तोंडात गुळाचा खडा देऊन ते सुध्दा अक्षरशः वैतागून जातात.  कारण याठिकाणी बांधकामाच्या बाबतीत गल्लीबोळात स्वयंघोषित इंजिनियर आणि वकील आहेत. जे होणार्‍या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी अग्रेसिव्ह असतात. या सर्वांची तोंड गोड करताना ठेकेदारांकडून अनेकदा चांगल्या कामाचा दर्जा प्राप्त होत नाही. इथला स्थानिक नागरिक पिढ्यानपिढ्या लाल मातीच्या रस्त्यावर जीवन व्यथित करत असताना काळानुसार जीवनशैलीत, व्यवसायात सुध्दा बदल घडवून आणणे हे सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य असते तेव्हाच कुठे गावाचे परिवर्तन आणि विकसनशील गाव बनते असेही जाणकार मंडळी बोलत आहेत.

नौरोजी उद्यानापर्यंत क्ले पेव्हर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील कामे पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए ठेकेदार सुध्दा तितक्याच जोमाने कार्यरत दिसत आहे. त्यामुळेच व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

माथेरानला धुळविरहित रस्त्यांचे काम चालू आहे त्यामुळे व्यापारी, स्थानिकांबरोबर पर्यटक सुद्धा आनंदीत आहोत. व्यापार्‍यांना होणार्‍या धुळीच्या दुष्परिणामापासून मुक्तता मिळणार या आनंदात आम्ही सर्वजण आहोत.लाल मातीतील धुळीच्या रस्त्यावर लिद असल्या कारणाने आरोग्याच्या अनेक आजारास सामोरे जावे लागत आहे. तसेच या धुळीने विक्रीच्या मालाची सुद्धा हानी होत असते. मागील काळात आम्ही राजकीय नेत्यांना माथेरानला येण्याचे निमंत्रण दिले असता त्यांनी नकार दिला होता. ते बोलले, तुमच्याकडे खूप धूळ आहे व त्याचा मला त्रास होतो. -ज्ञानेश्वर बागडे, व्यापारी माथेरान

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply