भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या गिरीशभाऊंच्या जाण्याचे पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आणि सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनांनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एका कंपनीतील कर्मचारी ते खासदार असा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973मध्ये टेल्को कंपनीत कामगार म्हणून रूजू झाले. तेथे काम करीत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा लढा दिला. त्या वेळी दोन वर्षांच्या काळात आणीबाणीमध्ये ते 19 महिन्यांसाठी नाशिक जेलमध्ये होते. राजकीय जीवनात सर्वप्रथम 1983मध्ये ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीन टर्म ते नगरसेवक होते. विशेष म्हणजे महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवलेे. पुढे 1993मध्ये झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. कसबा पेठ मतदारसंघात 1995पासून सलग पाच वेळा ते आमदार म्हणून विजयी झाले. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर 2019मध्ये पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य तसेच विकासाचे राजकारण केले. त्यामुळेच चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बापट यांनी व्हीलचेअर बसून आणि कृत्रिम श्वासोच्छवास घ्यावा लागत असतानादेखील पक्षासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. पक्षनिष्ठा कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी या निमित्ताने घालून दिला. एवढेच नव्हे तर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर त्यांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटनाला काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हाच सर्वसमावेशकपणा बापट यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होते. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी जनतेची कामे करून घेण्याचे कसब त्यांना अवगत होते. दांडगा लोकसंपर्क ही बापट यांची जमेची बाजू मानली जायची. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर झाला. असा हा सुसंस्कृत, दिलदार नेता आपल्यातून निघून गेला आहे. पुण्यासह भाजपने अलीकडच्या काळात तीन मोठे नेते गमावले. पहिल्यांदा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप आणि आता पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे असाध्य आजाराने निधन झाले. त्यांना सर्वपक्षीयांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे मोठेपण अधोरेखित केले. ईश्वर बापट यांच्या आत्म्यास चिरशांती आणि हे दु:ख पचविण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही प्रार्थना! गिरीशभाऊ आता आपल्यात शरीररूपी नसले तरी स्मृती रूपाने सदैव असतील एवढे नक्की!
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …