सिडनी : वृत्तसंस्था
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने पराभूत करीत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंनी त्यांच्या संघावर टीका केली आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी युवा खेळाडूंची तुलना करीत घरचा अहेर दिला आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया संघातील युवा खेळाडू अद्याप प्राथमिक शाळेतच असल्याचा टोला ग्रॅग चॅपल यांनी हाणला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी भारतीय संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर घेतलेल्या मेहनतीमुळेच हा विजय मिळवता आल्याचेही चॅपल यांनी ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’शी बोलताना सांगितले. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत आहे. त्या तुलनेत ऑस्ट्रेलिया खूपच कमी पैसे खर्च करते. बीसीसीायप्रमाणेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणूक करायला हवी. भारताच्या तरुण खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणीच्या संघांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम पाच संघांपैकी एक आहे यात कोणतीही शंका नसल्याचेही चॅपल म्हणाले.