अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग शहरातील प्रत्येक भागावर यापुढे सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे. शहरात 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून 120 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा नियोजन समिती, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून अलिबाग शहरात सीसीटीव्ही कॅमेरे शहरभर बसविण्यात येणार आहेत. या सीसीटिव्हीचे नियंत्रण अलिबाग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर नगरपालिका प्रशासन सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित व देखरेख करणार आहे. अलिबाग शहरात येण्यासाठी असलेले सर्व प्रवेशद्वार, मुख्य चौक, बस डेपो, बाजारपेठ, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, कार्यालये यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या सीसीटीव्ही प्रणालीव्दारे अलिबाग शहराचे सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षमीकरण होणार आहे. मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. याच धर्तीवर अलिबाग धर्तीवर अलिबाग शहरात सीसीटिव्ही कॅमेर्याचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत.
अलिबाग शहरात प्रवेशद्वार, रस्ते, बीच, मैदाने, बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या सीसीटिव्हीच्या माध्यमातून अलिबाग पोलिसांची नजर शहरातील प्रत्येक भागावर राहणार आहे. तर सीसीटिव्ही कार्यान्वित यंत्रणा नगरपरिषद प्रशासनाची असणार आहे. सीसीटीव्ही प्रणालीव्दारे अलिबाग शहराचे सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षमीकरण होणार आहे.
– अंगाई साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अलिबाग नगरपरिषद