पेण ः प्रतिनिधी
पेणमधील मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांच्याकडून तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व त्यांचे साथीदारांना पेण पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी हबीब खोत यांचा पेण तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रीचा व्यवसाय असून या व्यवसायाविरोधात तहसील कार्यालयात तक्रार न करण्यासाठी एकाने हबीब खोत यांना भेटून संदीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार सायंकाळी फिर्यादींनी संपर्क केला असता, संदीप ठाकूर यांनी फिर्यादींना 1 जुलै रोजी राजू पोटे मार्ग, नारायण निवास येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलविले. त्याप्रमाणे फिर्यादी गेले असताना आरोपी संदीप ठाकूर, रफीक तडवी, शालोम पेणकर यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून सुरुवातीस तीन लाख रूपये व प्रत्येक महिन्यास 40 हजार रुपयाची खंडणी मागितली व न दिल्यास परवाना रद्द करण्याची व जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. यानुसार 7 जुलै रोजी आरोपीने संदीप ठाकूर यांच्या वतीने 50 हजार रुपये रोख फिर्यादीकडून स्वीकारले. उर्वरित दीड लाख रूपये रक्कम 11 जुलै रोजी देण्यात सांगितले.
याप्रकरणी फिर्यादी हबीब खोत यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सापळा रचून उर्वरित दीड लाखांची खंडणी घेताना संदीप ठाकूर यांच्या हस्तकाला ताब्यात घेतले. आपण ही खंडणी संदीप ठाकूरसाठी घेतल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर संदीप ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली. आरोपी संदीप ठाकूर, रफिक तडवी, शालोम पेणकर व आणखी एकाविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. अधिक तपास डीवायएसपी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हा करीत आहेत.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
मंत्री आदिती तटकरे यांनीही केली पाहणी उलवे नोड : रामप्रहर वृत्तमातृभाषेत शिक्षण घेतल्यावरही आपली चांगली …