चौकडी ताब्यात; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेल : वार्ताहर
टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यावर पैसे लावून जुगार खेळणार्यांवर गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने छापा टाकत चार जणांना अटक केली आहे. या छापेमारीत सात लाख 45 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खारघर केसर बिल्डिंग नं. 4 येथे रूम नं. 702मध्ये काही व्यक्ती टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि. 13)खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यावर बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा मारून चार जणांना ताब्यात घेतले आहे.
या छापेमारीत निलेश राजकुमार रामरखयानी (वय 33), सुनील राजकुमार मखिजा (वय 43), सतिश गोविंद लोखंडे (वय 34) व जयकुमार तिरथदास कुकरेजा (वय 37) या चौकडीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे चौघे आपापसात संगनमत करून लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने व स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता विविध वेबसाईट व अॅपद्वारे क्रिकेट सामन्याच्या हार-जीतवर सट्टा लावताना व घेताना करताना आढळले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले सॅमसंग तसेच अॅपल कंपनीचे एकूण 22 मोबाइल फोन, लेनोव्हो कंपनीचे दोन लॅपटॉप, एक वायफाय राउटर असा एकूण सात लाख 45 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.