पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; ठेव विमा कायद्यातील बदलाचा लाभ
अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेल्या बदलमुळे बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ठेव विमा योजनेंतर्गत एक लाखांची मर्यादा वाढवून आता पाच लाखांची करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी बँक बुडाली तरी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंच्या ठेवींची रक्कम परत मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन आणि कर्नाळा नागरी बँकेच्या बहुतांश ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक मागील वर्षी दिवाळखोरीत निघाल्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स अॅन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना आता मूळ रक्कम व व्याज मिळून पाच लाखांपर्यंतच्या रकमेवर विमा संरक्षण मिळणार आहे.
बँकेच्या ग्राहकांना आतापर्यंत केवळ एक लाख रुपये इतकेच विमा संरक्षण होते. त्यामुळे बुडित बँकेच्या ठेवीदारांना एक लाख वगळता उर्वरित रकमेवर पाणी सोडावे लागत होते, परंतु आता केंद्र सरकारने कायद्यात बदल केल्याने अशा ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्या बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत, अशा बँकांच्या ठेवीदारांना निर्बंध लादल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत ही रक्कम अदा करावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील बुडित बँकांमधील लाखो ठेवीदारांना याचा मोठा लाभ होणार आहे. 10 वर्षांपूर्वी बुडित निघालेल्या पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी या निर्णयामुळे परत मिळणार आहेत. बँकेच्या 99 टक्के ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या बँकेचे जवळपास एक लाख 98 हजार ठेवीदार आहेत त्यापैकी एक लाख 95 हजार ठेवीदार या नव्या नियमानुसार ठेवी परत मिळण्यास पात्र आहेत. या खातेदारांना तब्बल 500 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. वैयक्तिक ठेवीदारांबरोबर विविध सहकारी संस्था, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, विश्वस्त मंडळे, शिक्षण संस्था यांचे अडकून पडलेले पैसेही परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेण अर्बन बँकेबरोबरच नुकत्याच बुडित निघालेल्या पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 95 टक्के ठेवीदारांना या नव्या बदलाचा लाभ होणार आहे.
केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेला बदल हा निश्चितच स्वागतार्ह आणि ठेवीदारांचे हित जपणारा आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण मिळणार आहे. पेण अर्बन बँकेच्या एकूण ठेवीदारांपैकी 99 टक्के ठेवीदारांना याचा लाभ मिळणार आहे.
-नरेन जाधव, कार्याध्यक्ष, पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती