Breaking News

विचारपूर्वक वाटचाल

भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दिमाखदार विजय संपादन केल्यानंतर हिंदीभाषिक पट्ट्यातील या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व असल्यानेच एव्हाना चार दिवस होत आले तरी अद्याप या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची निवड जाहीर झालेली नाही.

आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना आता भारतीय जनता पक्षामध्ये नवा जोश संचारलेला आहे. अर्थातच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळालेले नेत्रदीपक यश पक्षाच्या आत्मविश्वासाला अधिक बळकट करणारे ठरले आहे, परंतु या विजयाचा आनंद कितीही असला तरी भाजप लोकसभा निवडणुकांना संपूर्ण नियोजनपूर्ण तयारीनिशीच सामोरा जाणार हे स्पष्टच आहे. त्यामुळेच जनतेचा सुस्पष्ट कौल मिळाल्यानंतरही या तीन राज्यांमधील मुख्यमंत्रीपदाचे चेहरे निवडताना पक्षश्रेष्ठींकडून सर्व महत्त्वाच्या बाबींचा काटेकोरपणे विचार केला जातो आहे असे दिसते. मध्य प्रदेशात तर आधीपासूनच भाजपचीच सत्ता होती आणि आता प्रचंड जनादेशाने भाजपचे या राज्यातील स्थान अधिकच बळकट झाले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाने काँग्रेसच्या हातातून सत्ता हिसकावून घेतली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा शुभसंकेतच आहे. त्यामुळेच आता या राज्यांमधील सरकारस्थापनेच्या हालचाली करताना पुरेपूर काळजी घेतली जात असून सगळ्यांच्याच नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत. कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे दिल्लीतच ठरणार आहे. गेले दोन दिवस पक्षश्रेष्ठींच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रदीर्घ बैठका पार पडल्या आहेत. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचे नाव आघाडीवर असले तरी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. राजस्थानातही तीच स्थिती आहे. या राज्यात दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसुंधराराजे यांचे नाव यंदाही चर्चेत आहे, परंतु राजस्थानात वसुंधराराजे आणि मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी नव्या तरुण चेहर्‍यांना संधी देण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल आहे अशी चर्चा निवडणूक पार पडण्याच्या आधीपासूनच सुरू होती. त्यात आता या दोन्ही राज्यांमध्ये पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यामुळे वेगळ्या नावांचा विचार होऊ शकतो. अर्थात वसुंधराराजे यांचे समर्थक आमदार सातत्याने त्यांच्या गाठीभेटी घेत असून या शक्तिप्रदर्शनाचा कितपत प्रभाव पडतो हे लवकरच कळेल. राजस्थानात बाबा बालकनाथ, गजेंद्रसिंग शेखावत, दियाकुमारी, ओम माथुर, राज्यवर्धनसिंह राठोड यांची नावे चर्चेत आहेत. छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यातही मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार दिसत आहेत. तीन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेले रमणसिंग यांचे नाव या राज्यात प्राधान्याने चर्चेत असले तरी अन्य नावांमध्ये अरुण साव, विष्णुदेव साय, ओपी चौधरी आणि रेणुका सिंह आदी नावांचा समावेश आहे. यातील अरुण साव हे ओबीसी नेते असल्याने त्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करताना जातीय समिकरणांचा विचार करणे पक्षाला भाग पडणार आहे असे दिसते. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत पक्षाला दणदणीत विजय मिळाला असला तरी 2024च्या लोकसभा निवडणुका सोप्या नाहीत हे उघड आहे. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींकडून अतिशय विचारपूर्वक मुख्यमंत्रीपदाचे चेहरे निवडले जातील हे निश्चित.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply