Breaking News

रायगडकरांना आंब्याची चव उशिरा मिळणार

अलिबाग : प्रतिनिधी

लांबलेला पाऊस आणि थंडीला झालेला उशीर यामुळे यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. उशिरा आलेल्या मोहरामुळे फालधारणेलाही उशिरा सुरुवात होईल. त्यामुळे यंदा रायगडकरांना हापूस आंब्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. दुसरीकडे आंबा उशिरा बाजारात येणार असल्याने आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील कमी होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात 42 हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. त्यापैकी 14 हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादन देणारे आंबा पीक घेतले जाते. यातून जवळपास 21 हजार मेट्रीक टन आंब्याचे उत्पादन मिळते. या वर्षी मात्र आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे; कारण साधारणत: 15 नोव्हेंबरपासून आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होते, परंतु यंदा पावसाचा मुक्काम लांबला. थंडीही सुरू झालेली नाही. 15 डिसेंबरनंतर मोहोर येण्याची चिन्हे आहेत. मोहोर उशिरा आल्यामुळे पक्वतेसही उशीर होेईल. त्यामुळे रायगडातील आंबा बाजारात उशिरा येणार आहे.

रायगडातील आंबा बाजारात येण्यापूर्वी सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बाजारात आलेला असेल. रायगडचा आंबा बाजारात उशिरा आल्यामुळे या आंब्याला अपेक्षित दर मिळेल की नाही याबाबत साशंकता असेल. योग्य दर मिळाला नाही, तर आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील घटण्याची शक्यता आहे.

चालू वर्षीचा हवामानाचा अंदाज घेता येत्या 15 दिवसांत आंब्याला मोहोरण्यास सुरुवात अपेक्षित आहे. मोहोर संरक्षणाची पूर्वतयारी म्हणून नवीन फुटणार्‍या पालवीवर शेंडा पोखरणारी आळी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply