Breaking News

पर्यटकांच्या साक्षीने माथेरानचा वाढदिवस साजरा

कर्जत : बातमीदार : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून, या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) पर्यटकांनी भरगच्च भरलेल्या नौरोजी उद्यानात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरान उदयास आणले होते. या पार्श्वभूमीवर येथील नौरोजी लॉर्ड उद्यानात माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या माध्यमातून 21 मे रोजी रात्री 8 वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

गेली 22 वर्षे माथेरानच्या वाढदिवसाला येत असलेल्या पेमेंटा दाम्पत्याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.  माथेरान 22 वर्षांपुर्वी वेगळं होत, आता यामध्ये जरी बदल झाले असले तरी येथील पर्यावरण, लालमातीचे रस्ते हे मनाला भुरळ घालतात महत्वाचं म्हणजे येथे मोटारवाहनांना बंदी असल्याने माथेरान आमच्या मनात बसलेलं पर्यटनस्थळ आहे, असे पेमेंटा दाम्पत्यानेे यावेळी सांगितले.

माथेरान हे प्रत्येक पर्यटकाचे असून, याची स्वच्छता सर्वांनी राखली पाहिजे, असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सुचविले तर पर्यटकांनी हरकती व सूचना द्याव्यात, त्यांची पुर्तता करण्यासाठी नगर परिषद प्रयत्न करेल व पर्यटकांना माथेरान हे स्वतःचं पर्यटनस्थळ वाटेल, असे गटनेते प्रसाद सावंत म्हणाले.

हा वाढदिवस साजरा होत असताना पर्यटकांसह येथील नागरिकांनी नौरोजी उद्यान गजबजून गेले होते. या वाढदिवसासाठी अमोल मेनन, आशाताई कदम, लक्ष्मण कदम, मंगेश मोरे, विकास पार्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना …

Leave a Reply