Breaking News

नवकेतन फिल्म @ 75 : चित्रपट इतिहासातील मानाचे स्थान

मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी मराठी चित्रपटांचे विशेष खेळ महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात येतात त्या प्रत्येक वेळी 147 क्रमांकाचे कार्यालय मला कायमच खुणावत असते. जुन्या आठवणीत नेत असते. याचं कारण तेथे नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेचे स्थापनेपासूनच कार्यालय होते. कालांतराने सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपट प्रसिद्धीतील आघाडीचे पीआरओ बनी रुबैन यांनी त्याच जागेत आपले प्रशस्त कार्यालय सुरू केले आणि ऐंशीच्या दशकात मी मीडियात आल्यावर मला त्या कार्यालयात जाण्याचा अनेकदा योग येत असतानाच सतत मला नवकेतन फिल्मचे गाईड, तेरे घर के सामने, तेरे मेरे सपने आठवत असत…
नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेचे पंचाहत्तरावे अर्थात अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांसाठी ही अतिशय सुखावणारी गोष्ट. नवकेतन फिल्म या नाव व निर्मिती संस्थेच्या जन्माचा एक किस्सा प्रसिद्ध आहे, चित्रपटाच्या जगात काही वेगळ्या गोष्टी घडतात याचा त्यातून प्रत्यय येतो…
नीचा नगर (1949) दुर्दैवाने व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरल्याने दिग्दर्शक चेतन आनंद निराश होणे स्वाभाविकच. दिग्दर्शक हळवे असण्याचे ते दिवस. तो काळ आपल्या चित्रपटाला रसिकांनी नाकारताच त्यातील कलाकार, निर्माता व दिग्दर्शक विलक्षण उदास होण्याचा होता, कारण आपल्या चित्रपटाबाबत विलक्षण आस्था, आत्मियता, प्रेम असे. त्याच वेळेस स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद होताच. नवीन उमेद, उत्साह होता. अशातच देव आनंदची अभिनेता म्हणून प्रभात फिल्मच्या हम एक है (1946)पासून सुरुवात झाली होती. त्याला आणखी काही चित्रपट मिळत होते आणि अशातच त्याने विजय आनंद व बहिणींनाही गुरदासपुरवरून मुंबईत बोलावून घेतले. तेव्हाची मुंबई वांद्रे, सायनपर्यंत होती.
चेतन आनंदला पुन्हा उभारी देण्यासाठी काय करता येईल या विचारात असतानाच देव आनंदने आपली चित्रपट निर्मिती संस्था निर्माण करायचे ठरवले. काही नवं (नया) करायचे त्याच्या मनात आले आणि तेव्हाच चेतन आनंदची पत्नी उमा हिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव केतन.
…आणि मग नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना झाली. चित्रपटाचा एक नवा इतिहास जन्माला आला. कंदिल दिवा हे नवकेतनचे बोधचिन्ह. याचं कारण पंजाबमधील गुरदासपुरच्या गावातील घरी बालपणात असलेला रस्ता आणि तेथे अंधुक प्रकाश देत असलेले दिवे. त्यातून जाताना हाती कंदिल ठरलेला आणि पहिला चित्रपट चेतन आनंद दिग्दर्शित अफसर (1950) देव आनंद व सुरय्या यांच्या भूमिका. तोही प्रदर्शित होताच अपयशी ठरला.
तो काळ चित्रपट निर्मिती संस्थांचा होता. ते दिवसच वेगळे होते. नवकेतन फिल्मला आपले अस्तित्व निर्माण करून ते टिकवण्यात मोठीच स्पर्धा होती. नवकेतन फिल्मचा गुरुदत्त दिग्दर्शित बाजी (1951) यशस्वी ठरला आणि सकारात्मक वाटचाल सुरू झाली. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वात मोठे चलनी नाणे, ते आत्मविश्वास देते. आपला फोकस स्पष्ट करते.
चेतन आनंद दिग्दर्शित आंधिया (1952), ए.एन. बॅनर्जी दिग्दर्शित हमसफर (1953), चेतन आनंद दिग्दर्शित टॅक्सी ड्रायव्हर (1954), एम.के. बर्मन दिग्दर्शित मकान नंबर 44 (1955), चेतन आनंद दिग्दर्शित फंटूश (1956) असे नवकेतन फिल्मने सातत्य ठेवले. यात चेतन आनंद दिग्दर्शित चित्रपटांचा सहभाग मोठा. यानंतर विजय आनंदने नौ दो ग्यारह (1957)पासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि नवकेतन फिल्मचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. निर्मिती संस्था व त्यांचे चित्रपट हे एक समीकरण असल्याचे ते दिवस. तेव्हाचा चित्रपट रसिक त्यावरून चित्रपटाशी जोडला गेला व अपेक्षा ठेवू लागला. नवकेतन फिल्मने आता चित्रपट निर्मितीत सातत्य ठेवले आणि आपला जणू विस्तार केला.
राज खोसला दिग्दर्शित काला पानी (1958), विजय आनंद दिग्दर्शित कालाबाजार (1960), तेरे घर के सामने (1963), अमरजीत दिग्दर्शित हम दोनो (1961) असे करत करत आर.के. नारायण यांच्या गाईड कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट 1965 साली आला. चेतन आनंदकडे असलेले दिग्दर्शन विजय आनंदकडे आले आणि एकाच वेळेस हिंदी व इंग्लिशमध्ये पडद्यावर आलेल्या या चित्रपटाने नवकेतन फिल्म, विजय आनंद, देव आनंद, वहिदा रेहमान आणि मुंबईतील या चित्रपटाचे मुख्य चित्रपटगृह मराठा मंदिर या सगळ्यांनाचा प्रतिष्ठा प्राप्त झाली. एक दर्जेदार कलाकृती बरेच काही देत असते. आजही ‘गाईड’चे वलय व महत्त्व कायम आहे याचा अनुभव देव आनंदच्या जन्मशताब्दीनिमित्त जुहूच्या मल्टीप्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या देव आनंद चित्रपट महोत्सवात आला. खुद्द वहिदा रेहमान या खेळास हजर होत्या आणि आम्ही सगळेच चित्रपट रसिक पुन्हा एकदा गाईड पाहताना रोमांचित झालो होतो. गाईड नवकेतन फिल्मची सर्वोत्कृष्ट कलाकृती. गाईड ऑस्करसाठीची भारताची अधिकृत प्रवेशिका होती. प्राथमिक फेरीत तो बाद झाला म्हणून त्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.
विजय आनंद दिग्दर्शित ज्वेल थीफपर्यंत (1967) नवकेतनचा दबदबा होता. त्यात चित्रपटांच्या गुणवत्तेचा मोठाच वाटा. दरम्यान चेतन आनंदनेही आपली हिमालय फिल्म अशी चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करून आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली होतीच. सगळं कसे व्यवस्थित सुरु असतानाच काही अनपेक्षित गोष्टी घडल्या. देव आनंद दिग्दर्शनाचा विचार करू लागला. देव आनंद हा युवा पिढीचा रोमॅन्टीक हिरो आणि आपलं देव आनंद असणं हे पडदाभर छान जपत, मांडत रसिकांवर मोहिनी टाकत होता. गाईड वगळता त्याने आपण देव आनंद आहोत याचा स्वत:ला, रूपेरी पडद्याला आणि रसिकांना अजिबात विसर पडू दिला नव्हता. ही त्याची मोठीच खासियत आणि मिळकत. तरी तो दिग्दर्शनाच्या वाटेला गेला? आपल्यालाही या माध्यम व व्यवसायात एक पाऊल पुढे टाकायचंय असे त्याला वाटावे? स्वत:च्या प्रतिमा व लोकप्रियतेच्या प्रेमात असणार्‍यांस असे वाटू शकते. तरी बरं धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा हे निर्माते झाले, पण दिग्दर्शक झाले नाहीत. आपल्या मर्यादा त्यांनी व्यवस्थित ओळखल्या. देव आनंदला ते जमले नाही आणि दिग्दर्शन झेपलेही नाही. आपल्या पहिल्या चित्रपटाचे अंहिसा हे नावही त्याने चित्रपट निर्मिती संस्था इम्पात नोंदवले. चित्रपटावर काम करता करता ते बदलून प्रेम पुजारी केले. पडद्यावर आपल्या केवळ असण्यातही प्रणय करताना पहावे तर ते देव आनंदला. त्यामुळे प्रेम पुजारी परफेक्ट.
दक्षिण मध्य मुंबईतील शालिमार या नवीन चित्रपटगृहाचे प्रेम पुजारीने (1970) उद्घाटन. नवकेतन फिल्मचा जणू एक नवीन वा वेगळाच प्रवास (की घसरण?) सुरू झाला. विजय आनंदने नासिर हुसेन यांच्या बॅनरचा तिसरी मंझिल (1967) स्वीकारताना नवकेतनबाहेर एक प्रकारे पाऊल टाकले होतेच. चित्रपट वितरक गुलशन रॉय यांनी त्रिमूर्ती फिल्म अशी चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करताच विजय आनंदने त्यासाठी जॉनी मेरा नाम (1970) दिग्दर्शित केला. नवकेतनचा तेरे मेरे सपने (1971) मात्र फसला. देव आनंदने हरे राम हरे कृष्णमध्ये (1972) दिग्दर्शन चमक दाखवली. विजय आनंदचा मॅकनॉज गोल्डवर आधारित छुपा रुस्तम (1973) अगदीच फसला. गोल्डीचा जणू उतार काळ सुरू झाला आणि नवकेतनचाही म्हणायचे?
11 मे 1973 रोजी इंपिरियल थिएटरला प्रदर्शित झालेल्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीरने वातावरण बदलायला सुरुवात केली आणि पुढच्याच शुक्रवारी 18 मे रोजी छुपा रुस्तम आला. काय योगायोग बघा. अमिताभचा अ‍ॅन्ग्री यंग मॅनचे आगमन आणि नवकेतन फिल्मचा उतार यांची जणू गाठच पडली. चित्रपट इतिहासातील ही अतिशय दुर्लक्षित तरी खूप महत्त्वाची गोष्ट.
देव आनंद नवकेतनसाठी, तर विजय आनंद अन्य निर्मात्यांसाठी चित्रपट दिग्दर्शित करू लागले. आता नवकेतन फिल्मचे जुने चित्रपट पहावेत ते रिपीट रन, मॅटीनी शो आणि गल्ली चित्रपटात असे झाले. देस परदेसपर्यंत देव आनंद हीरो म्हणून आणि दिग्दर्शक म्हणूनही त्याच्या चाहत्यांना आवडला. नंतर मात्र त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटात काय पाहिले हे आठवूनही सांगता येणार नाही. तो त्याचा दिग्दर्शनाचा अट्टाहास होता. मेहबूब स्टुडिओत मुहूर्त आणि मग मुंबईत इकडे तिकडे शूटिंग असताना आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टिंगचे आवर्जून आमंत्रण येऊ लागले आणि लाईव्ह देव आनंद अनुभवायला मी जावूदेखील लागलो. मीडियात असलो तरी या देवाचा भक्त. त्याच्या अव्वल नंबरमध्ये आमिर खान होता हे आज आश्चर्याचे वाटेल. त्या काळातील आमिर खान अनेक सपक चित्रपटात दिसला. आपला चित्रपट पूर्ण होताच देव आनंद पाली हिलवरील झिगझॅक रोडवरील आपल्या आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओतील सभोवार वजनदार इंग्लिश पुस्तके असलेल्या कार्यालयात दिवसाला एक याप्रमाणेच तास दीड तासाची मुलाखत देई. याचा मी दोनदा छान अनुभव घेतला. पत्रकारितेने मला दिलेल्या सुखद गोष्टीत हीदेखील एक.
खारच्या आपल्या केतनव डबिंग थिएटरमध्ये त्याच्या चित्रपटाची आम्हा काही निवडक पत्रकारांसाठी ट्रायल आयोजित करुन आपलेच कौतुक ऐकून घेणे, चित्रपट प्रदर्शित होताना न्यू एक्सलसियरच्या मिनी थिएटरमध्ये अथवा राजकमल कलामंदिर स्टुडिओत समिक्षकांसाठी खेळ आयोजित करताना स्वत: हजर राहणे (सच्चे का बोलबाला, गॅन्गस्टर, सेन्सॉर वगैरे त्याच्या चित्रपट व दिग्दर्शनावर बोलणार काय? तरी देव आनंदने आपला हा हट्ट सोडला नाही. आशावाद म्हणतात तो हाच). हे सगळेच देव आनंद एके देव आनंद होत गेले. नवकेतन फिल्म हरवत गेले. कलाकार मोठा होताना निर्मिती संस्था मागे राहणे हे योग्य नव्हतेच. नवकेतनपेक्षा देव आनंदचा जुहू येथील आयरीश पार्क येथील प्रशस्त बंगला जास्त चर्चेचा विषय ठरला. तो विक्रीला काढलाय या चर्चेचे वादळ निर्माण झाले. मीदेखील त्या समोर उभे राहून एक व्हिडीओ चित्रीत केला. आज देव आनंद आपल्यात नसला तरी या बंगल्याबाहेरही त्याच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे एक प्रकारचे अस्तित्व जाणवले.
नवकेतन फिल्मला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्त विजय आनंदने मनोहर नाथ रंगू दिग्दर्शित जान हाजीर है या चित्रपटाची निर्मिती करताना देवबंधूंचा भाचा शेखर कपूर, प्रेमनाथचा मुलगा प्रेम किशन आणि नताशा या नवीन चेहर्‍यांना संधी दिली. जय पार्टे यांच्या संगीतातील गाणी लोकप्रिय झाली आणि जमुना चित्रपटगृहात मॅटीनी शोला चित्रपटाने तब्बल साठ आठवडे मुक्काम केला. देव आनंदने याचनिमित्त नवकेतनसाठी चेतन आनंदकडे दिग्दर्शन सोपवत टॅक्सी ड्रायव्हरची (1954) रिमेक जानेमनची (1976) निर्मिती केली. बावीस वर्षांत देव आनंदमध्ये बदल झाला असेल वा नसेलही. नवकेतनमध्ये नक्कीच झाला. हीरा पन्नाला वितरक न मिळाल्याने नवकेतनेच तो मुंबईत वितरित केला. त्याच्या जाहिरातीत नवकेतन वितरण ही जणू नवीन माहिती ठरली. इश्क इश्क इश्कने (1974) फ्लॉपचे सगळेच विक्रम मोडले. देव आनंदने विजय आनंदची दिग्दर्शनीय साथ सोडू नये आणि विजय आनंदने अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका करू नये असे नवकेतनप्रेमींना वाटत होते, पण चाहत्यांच्या इच्छेनुसार चित्रपटाचे जग चालत नसते. तर चित्रपटात जे काही दाखवलंय, दिसतंय यावर आपण प्रेम करु शकतो, ते पाहू शकतो. वा नाकारू शकतो. देव आनंद दिग्दर्शित लूटमार, स्वामी दादापासूनच्या चित्रपटांना आपण पाहून नाकारले. ते पाहणे देव आनंद प्रेमापोटी होते. नंतर तेही का पहावे असाच प्रश्न होता. समिक्षक म्हणून पाहत राहिलो आणि साठच्या दशकातील देव आनंद डोळ्यासमोर आणत राहिलो.
आपला मुलगा सुनील आनंदला आनंद और आनंदने रूपेरी पदार्पणाची संधी दिली तरी चित्रपटात देव आनंद जास्त दिसला. (या चित्रपटात स्मिता पाटील होती. नवकेतनच्या चित्रपटात तिने काम केलंय, पण तेही देव आनंदच्या दिग्दर्शनात. तरीही देव आनंदच्या दिग्दर्शनाला कमी लेखावे?) नवकेतनच्या मै तेरे लिए या चित्रपटाच्या मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताला तिघे आनंद बंधू एकत्र आल्याचे दिसले. विशेष म्हणजे दिग्दर्शन विजय आनंदकडे आणि सुनील आनंद व मीनाक्षी शेषाद्री प्रेमिक. हा चित्रपट बराच रखडून कसाबसा प्रदर्शित झाला. यानिमित्त केतनव डबिंग थिएटरमधील कार्यालयात विजय आनंदची मुलाखत घेतल्यावर त्याने भेट म्हणून दिलेले गाईडचे बुकलेट माझ्या संग्रहात आहे.
…देव आनंदला थांबणे मंजूर नव्हते हा कौतुकाचा भाग, पण ते नवकेतन फिल्मच्या पथ्यावर पडले का? जाना ना दिल से दूर नावाच्या चित्रपटासाठी विजय आनंदच्या दिग्दर्शनात देव आनंद असा. बर्‍याच वर्षांनी योग आला. उत्साहात मुहूर्त झाला. (यू ट्यूबवर तो आहे) चित्रपट पूर्णही झाला. केतनव डबिंग थिएटरमधील ट्रायल संपल्यानंतर बाहेर पडताच नेहमीप्रमाणेच देव आनंद आम्हा समिक्षकांचे चेहरे वाचत होता. पहिल्यांदाच तो काहीसा निराश वाटला.
नवकेतनची सुरुवात, तेरे मेरे सपनेपर्यंचा चढता प्रवास आणि मग उतार हे सगळेच घडत असतानाच या बॅनरच्या अनेक क्लासिक चित्रपटांचे अस्तित्व, चित्रपट इतिहासातील स्थान, रसिकांचे त्या चित्रपटांचे आकर्षण आणि महत्त्व कायम आहे हे महत्त्वाचे. हे महत्त्व नवकेतनच्या चित्रपटातील विजय आनंदचे दिग्दर्शन कौशल्य, देव आनंदचं दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि श्रवणीय गीत संगीत यातून कायम आहे आणि राहिलही.
नवकेतन फिल्मच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित करायला हवाच. तो जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांना फ्लॅशबॅकमध्ये जाण्याची चंदेरी/रूपेरी/सोनेरी संधी तर आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला चित्रपटाचा गौरवशाली इतिहास ज्ञात होण्याचा योग.
याच निमित्ताने मुंबई दर्शनात सलमान खान, शाहरुख खान यांच्या बंगल्याप्रमाणेच जुहूच्या आयरीश पार्क येथील देव आनंदचा आनंद बंगलाही दाखवायला हवा. नवकेतन फिल्म ही एक आपली काही वैशिष्ट्य असलेली चित्रपट निर्मिती संस्था.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply