कर्जत ः बातमीदार
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरानमध्ये कोविडचा प्रदुभाव रोखण्याकरिता नगरपालिकेने येथील शासकीय कर्मचार्यांची अँटिजेन चाचणी घेऊन परिपूर्ण खबरदारी घेतली आहे. यामध्ये नगरपालिका कर्मचारी, पोलीस, महसूल विभागातील कर्मचार्यांचा समावेश आहे. माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो पर्यटक भेट देतात. मागील सहा महिन्यांपासून कोविडमुळे माथेरान लॉकडाऊन आहे, मात्र माथेरानबाहेरून येणार्या नागरिकांना सर्वप्रथम नगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांना सामोरे जावे लागते. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असताना आणि सणामध्ये रुग्णसंख्या अधिक वाढू नये या हेतूने पालिकेने अँटिजेन चाचण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 82 कर्मचार्यांनी अँटिजेन चाचणी करून घेतली. त्यामध्ये दोन पोलीस कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. ही चाचणी आतापर्यंत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात घेतली जात होती.त्यानंतर माथेरान नगरपालिकेच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.