Breaking News

रामकी कंपनीची भिंत कोसळलेल्या परिसराची आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

गावकर्‍यांसोबत समिती नेमण्याची सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त
रामकी कंपनीभोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकर्‍यांसोबत एक समिती नेमावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यानुसार येत्या सोमवार किंवा मंगळवारी पनवेल महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बैठक होणार आहे.
तळोजा एमआयडीसीसह मुंबई परिसरातील कंपन्यांच्या रासायनिक कचर्‍यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम रामकी ग्रुपची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करते. दोन वर्षापूर्वी येथील प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी कंपनीभोवती सुरू केलेल्या उंच सुरक्षा भिंतीला विरोध केला होता. सिद्धी करवले येथील स्थानिकांनी आंदोलन केले होते. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेली भिंत गुरुवारी कोसळली. सिद्धी करवले गावात जाणार्‍या एकमेव रस्त्याला लागून असलेली भिंत कोसळल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. कंपनीतील रसायनयुक्त लिचडचा भार भिंतीवर टाकल्यामुळे ती कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे स्थानिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी पोलीस उपायुक्त, एमआयडीसी प्रदूषण नियंत्रक मंडळ आदींकडे तक्रार केली आहे. साधारणतः 30 ते 35 फूट उंचीच्या भिंतीवर कचर्‍याचा मोठा लोड आल्याने ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली या संदर्भात काळजी न घेतल्यास भविष्यात या ठिकाणी मोठे अपघात घडू शकतात.
शंभर एकरात ही कंपनी कार्यान्वित आहे. रासायनिक आणि वैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया करून विघटित केला जातो, मात्र कंपनीकडून नियम पाळले जात नसल्याचा आरोप अनेक वेळा केला गेला आहे. संरक्षण भिंत कोसळल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी मंगळवारी (दि. 3) भेट दिली. या ठिकाणी जिथे भिंत पडली तेथे भिंतीचा आणखी भाग पडण्याचीही शक्यता असल्याने त्या संदर्भात त्यांनी उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली.
या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, रविकांत म्हात्रे, माजी सरपंच गोपीनाथ पाटील, संतोष पाटील, रमेश मढवी, सुरेश पोरजी, माजी सरपंच विष्णू मढवी, संतोष मढवी, वासुदेव मढवी, राजेश महादे यांच्यासह मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महापालिकेस हस्तांतरण

आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त एमएमआर भागात सगळ्यात चांगल्या …

Leave a Reply