Breaking News

नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ!; राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत विराट मोर्चा

उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार? -देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी (दि. 9) भाजपच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करीत उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार, असा सवाल केला. मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम व अंडरवर्ल्डशी संबंधित अन्य आरोपींकडून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांच्यावर आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने लावून धरली आहे, पण राज्य सरकार मलिकांचा राजीनामा घ्यायला नकार देत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात नेते, पदाधिकार्‍यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राज्याचे प्रमुख सत्तेसाठी लाचार झाले असल्याची घणाघाती टीका फडणवीसांनी केली. आम्ही मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मागतोय, पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सगळे जण एका सुरात सांगत आहेत की, आम्ही मलिकांचा राजीनामा घेणार नाही. ज्याने 1993मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट करून मुंबईकरांच्या चिंधड्या केल्या त्याचा माणूस आज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आहे. एक दिवस उद्धवजींना बाळासाहेबांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. मी सांगेन बाळासाहेब मी संघर्ष केला, पण उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आसूड ओढला. आमचा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे, दाऊदच्या साथीदारांविरोधात आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलेय त्यांच्यासाठी आम्ही लढणार. म्हणूनच मलिकांचा राजीनामा आम्ही मागतोय. आम्ही वाकणार नाही, झुकणार नाही. जर सरकारने मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला. आझाद मैदानामधून मेट्रो सिनेमागृहामार्गे हा मोर्चा विधानभवनाकडे जाण्यास निघाला असता पोलिसांनी मोर्चाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वाट अडवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यापाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आणि भाजपचे अन्य नेतेही पोलीस व्हॅनमध्ये चढले. काही वेळानंतर या सर्व नेत्यांना पोलिसांनी सोडून दिले. या मोर्चात रायगड जिल्ह्यातून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, श्रीनंद पटवर्धन, युवा नेते अमित घाग, उरण शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, दीपक बेहेरे, रमेश मुंढे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, युवा नेते किरण ठाकरे, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चेऊलकर, रोहा अध्यक्ष सोपान जांभेकर, पेण अध्यक्ष श्रीकांत पाटील, पनवेलचे ज्येष्ठ नेते सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, खालापूरचे तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, सल्लागार पंकज शाह, खोपोलीचे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, विजय तेंडुलकर, प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, सुनील नांदे, राहुल जाधव, संजय म्हात्रे यांच्यासह जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दाऊदच्या दबावामुळेच ‘तो’ निर्णय बदलण्यात आला -चंद्रकांत पाटील

राज्यात गेल्या 27 महिन्यांत संजय राठोड यांचा राजीनामा पक्षाने दबावात आल्यानंतर घेतला, तर अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर राजीनामा घेतला. आता नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजीनामा घ्यायचा निर्णय झाला, पण थोड्या वेळात हा निर्णय बदलला. हा निर्णय दाऊदच्या दबावामुळे बदलला, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अशा या सरकारला घालवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत, असेही ते म्हणाले.

रायगडातून असंख्य कार्यकर्ते झाले सहभागी

मविआ सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने मुंबईत काढलेल्या मोर्चात उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह रायगडातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

देशद्रोह्यांसाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे नेते आंदोलन करतात. गृहमंत्रीही या पुतळ्याखाली आंदोलनाला बसतात. त्या ठिकाणी महात्मा गांधी असते, तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते. गेंड्याच्या कातडीच्या या सरकारला पाझर फुटत नाही, मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने या देशावर आक्रमण केले, बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात अनेक निष्पाप माणसे मारली गेली. त्या दाऊदशी व त्याच्या माणसांशी संबंध ठेवणार्‍या लोकांना हे सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र कधीही दाऊदच्या कराचीसमोर झुकणार नाही. आजचा मोर्चा हा मलिकांच्या राजीनाम्यासाठीच आहे. सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा.

-आमदार आशिष शेलार, भाजप नेते

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply