Breaking News

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन

संगमेश्वर, महाड ः प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्य दिनावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत टीका केल्याने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी (दि. 24) रत्नागिरी पोलिसांकडून संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री महाडमध्ये आणण्यात आले. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रक्रियेनंतर ना. राणे यांना न्यायालयात हजर केले असता, या वेळी झालेल्या सुनावणीत जामीन मंजूर करण्यात आला.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ना. राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. दरम्यान, ना. राणेंना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहचले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नव्हते. तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणले. आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार आदी ना. राणे यांच्यासोबत होते.
या वेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ही अटक निषेधार्ह आहे. नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत. केंद्रात मंत्री आहेत. ते जेवत असताना पोलिसांनी धक्काबुक्की केली. केंद्रातील कॅबिनेट मंत्र्यासोबत राज्य सरकारने जे वर्तन केले ते चुकीचे आहे, असे आमदार लाड म्हणाले.
संगमेश्वरहून ना. राणे यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.
दरम्यान, ना. राणे महाडकडे येत असताना त्यांच्या ताफ्यावर नांगलवाडी फाट्यावर दगडफेक झाली. यात एका गाडीची काच फुटली. ही दगडफेक शिवसैनिकांकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. महाडमध्येही भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

भाजप राणे साहेबांच्या पाठीशी -फडणवीस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरू आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, देशाला शिव्या देतो, पण त्याच्यावर कारवाई नाही, मात्र नारायण राणेंच्या प्रकरणात कायद्याच्या भाषेत हा गुन्हा नसताना त्याचे गुन्ह्यामध्ये रूपांतर करून कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे आमच्या पक्ष कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांनी या हल्लेखोरांवर कारवाई करावी; अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ही तर ‘मविआ’ची सूडबुद्धी -चंद्रकांत पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक ही सूडबुद्धी आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नियम ध्यानात घेता ना. राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही तरीही कोकणात जनआशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, राणेसाहेबांची एक बोलण्याची शैली आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या नेत्याने काही विधान केले, तर त्याला उत्तर देण्याचा प्रघात आहे. लगेच गुन्हा दाखल करणे योग्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले होते किंवा त्यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज्यपालांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. हे असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील याचा विचार करावा.
सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू -आशिष शेलार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. ज्या प्रकारे राज्य सरकार वागत आहे ते बघता अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोक करीत आहेत, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकार आणि शिवसेनेला गर्भित इशारा देऊ
इच्छितो, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जनआशीर्वाद यात्रेत भाजपला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू. ही यात्रा सुरूच राहणार.
-जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर झालेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून झालेली आहे. पोलिसांनी राणे यांना कोणत्या कारणावरून अटक केली हे तपासण्यात येईल, तसेच आमची नेतेमंडळी कायदेशीर प्रक्रिया करणार असून न्यायालयाकडून सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते
महाराष्ट्र विधान परिषद

जनआशीर्वाद यात्रेचे आता जनआंदोलनात रूपांतर होणार आहे. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजप आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारने एक लक्षात घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या सरकारचे थडगे महाराष्ट्रात उभे केल्याशिवाय भाजप राहणार नाही.
-प्रमोद जठार, भाजप नेते

ना. नारायण राणेंविरोधात ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. घोटाळेबाजांना एक्सपोज करीत राहणार. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर यांच्यानंतर आता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणारच!
-किरीट सोमय्या, माजी खासदार

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply