पेण : प्रतिनिधी
येथील एसटी स्टॅण्डच्या मागील भागात असलेल्या अंतोरा रोडवरील समर्थ खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी (दि. 25) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील खते, बियाणे व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत.
पेणमधील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस समर्थ खत आणि बियाणे विक्री केंद्र असून, या चाळवजा इमारतीमधील दोन गाळ्यात खत, बियाणे व किटकनाशके ठेवण्याचे गोडावून वजा दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. शनिवारी पहाटे तीन -साडेतीनच्या सुमारास या दुकानात आग लागल्याचे पेण शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नगर परिषद आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलास पाचारण केले.
या आगीच्या घटनेत दुकानातील इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर इतर साधनसामुग्रीसह खरीप हंगामासाठी खरेदी केलेल्या लाखो रूपये किमंतीच्या बियाणांचा साठा भस्मसात झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. पेण तलाठी शिवाजी वाबळे यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून, सुमारे 35 लाखाच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.