अलिबाग : पावसाळा आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक रविवार (दि. 26)पासून बंद होत आहे. चार महिने ही जलप्रवास वाहतूक बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यापासून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईहून अलिबागला येण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे जलप्रवास. या प्रवासामुळे वेळेची, पैशाची बचत होत असल्याने प्रवासी वर्षातले आठ महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने करीत असतात. पावसाळ्यात या प्रवासी बोटी बंद ठेवल्या जातात.
पोलादपूरमध्ये आज विहीर स्वच्छता मोहीम
पोलादपूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार (दि. 26) पोलादपूर तालुक्यातील उमरठ, रानवडी व लोहारमाळ या गावांमध्ये विहीर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर व नेहमीच भेडसावणार्या पाणीटंचाई लक्षात घेऊन रविवारी राबविण्यात येणार्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
वाहनचालकांवर कारवाई
पेण : वडखळ वाहतूक पोलिसांनी 1 ते 22 मे या कालवधीत अवैद्य वाहतुकीविरूद्ध धडक मोहीम राबवून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 249 वाहन चालकांवर कारवाई करून 78 हजार 800 रूपयांचा दंड वसूल केला. रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक सुरेश वराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार पी. एन. मिसाळ, विश्वनाथ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल डी. एम. नाईक, नयन वाघमारे, लहू माने, प्रविण पिपरकर, विकास साखरकर मदन पाटील, मधुकर माडवे आदिंनी ही कारवाई केली.
सोन्याचे दागिने लंपास
रेवदंडा : सासवणे ते चौल भोवाळे असा मिनीडोर रिक्षा प्रवास करताना पिशवीत ठेवलेल्या डब्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. चौल भोवाळे येथील मयुरी नाईक गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सासवणे ते चौल भोवाळे असा मिनीडोर प्रवास करीत होत्या. या प्रवासादरम्यान त्यांच्याकडील कापडयाच्या बॅगेत ठेवलेल्या डब्यातून विविध प्रकारचे एक लाख 48 हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने व 250 रूपये रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरुन नेली. याबाबत मयुरी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.