धाटाव ः प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण व सहप्रभारी अॅड. ॠषीकेश जोशी तसेच जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा आढावा आणि पुनर्रचना बैठक कोलाड येथे झाली. युवा मोर्चाच्या पुनर्बांधणीसाठी तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या कामाचा अहवाल घेणे व नवीन पदाधिकारी निवड यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चाने तळागाळातील सामान्य कुटुंबातील व्यक्तीला केंद्र शासनाच्या विविध योजनांतून लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करणे तसेच निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झालेल्यांसाठी मदत निधी किती आला व तो कोठे खर्च केला याविषयी माहिती घ्यावी व तहसीलदार येथे कोविड निधी किती आला, केंद्र सरकारच्या वतीने रायगड जिल्ह्यात 40 वेंटिलेटर कुठे दिले याची माहिती घ्यावी व जिल्ह्यातील अपुर्या सोयीसुविधांविरोधात आवाज उठवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यासह येणार्या काळात युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आक्रमक भूमिका घेत सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणार आहेत, असे घाग यांनी सांगितले.
या वेळी युवा मोर्चाच्या सोशल मीडिया जिल्हा संयोजकपदी रोहा तालुक्यातील राजेश डाके यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अलिबाग तालुक्यातील शौकीन राणे व श्रीवर्धन तालुक्यातील अॅड. जयदीप तांबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या आढावा बैठकीस दक्षिण रायगड युवा मोर्चा सरचिटणीस शिवाजी पाटील यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच रोहा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.