उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी (दि. 2) पार पडला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करीत समाधान व्यक्त केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
पनवेल महापालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार कामोठे परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तेथील सुषमा पाटील विद्यालयामध्ये हा उपक्रम झाला. या वेळी नागरिकांनी सुरक्षा, आयुष्यमान क्लिनिक, पाणीटंचाई, प्रदूषण, ग्राउंड, भाजी मार्केट, गार्डन, विरंगुळा केंद्र, स्पीडब्रेकर, पाणीपुरवठा, अग्निशमन दल, पेट्रोल पंप, मालमत्ता करासंदर्भात शास्ती माफी, लाईट, रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न, अनधिकृत गॅरेज, टॉयलेट, विरंगुळा केंद्र, वाचनालय, स्मशानभूमी, जिमखाना, मंदिरे अधिकृत करण्यासंदर्भातला विषय, पार्किंग यांसह विविध विषय मांडले. या प्रश्नांची उत्तरे देत लवकरात लवकर या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असून प्रत्येक तीन महिन्यात नंतर या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तसेच प्रत्येक महिन्यात एका शहरात आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी ज्या समस्या, तक्रारी सूचना मांडल्या आहेत त्यांना 10 ते 15 दिवसांमध्ये लेखी उत्तर देणार असल्याची माहिती दिली.
एकूणच नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमाला भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, महिला मोर्चा शहराध्यक्ष वनिता पाटील, हॅप्पी सिंग, प्रदीप भगत, भाऊ भगत, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील, विद्या तामखडे, तेजस जाधव, दामोदर चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.