Breaking News

अष्टपैलू गायिका आशा भोसले

आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय आणि सांगावे असे अक्षरशः बरेच काही आहे, तर मग ते सांगूनही बरेच काही सांगायचे राहून जाईल की काय असा प्रश्न पडावा असं हे चौफेर, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.
सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न, आशाताईंना मृत्यूची चाहूल लागली होती अशी शंका त्यांच्या इन्स्टावरच्या शेवटच्या पोस्टवरून येते. १८ मार्च रोजी त्यांनी केलेली ही पोस्ट आहे, आशा भोसले यांच्या निधनानंतर (१२ एप्रिल २०२६) या पोस्टची सोशल मीडियात बरीच चर्चा झाली. त्या पोस्टमध्ये त्यांनी ‘ इंटरनॅशनल गोरिल्लाज’ या बँडसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये भारतीय वस्ती, हत्ती आणि काही मोडकळीस आलेल्या वस्तू दिसत आहेत. फोटोमध्ये आशाताई अत्यंत शांत आणि साध्या अवतारात दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्या म्हणतात, या बँडचं shadowi light हे गाणं माझ्यासाठी गहन अर्थ घेऊन आलेलं आहे.
त्यात त्या पुढे लिहितात, वाराणसीला जाऊन पवित्र गंगा नदीतून प्रवास करताना मी जे काही जवळून पाहिलं त्यातून मला आयुष्याचा अर्थ समजला. मी कोण आहे आणि पृथ्वीवर मला काय करायचं आहे हे कळलं. ‘द शॅडोवी लाईट’मध्ये या खोल नदीचं पार करणं म्हणजे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे.
माझा जन्म, माझी नाती, माझं संगीतावरील समर्पण, माझी यशस्वी वाटचाल आणि मुलगी, आई, बहीण, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्यं. या प्रवासात बोट चालवणारा नावाडी म्हणजे माझं संगीत आहे. जे मला आयुष्याच्या या नदीतून जाताना मार्गदर्शन करतं.
पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, जेव्हा मी या नदीच्या दुसऱ्या काठावर पोहचेन तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मला मोक्ष प्राप्त होईल. अंतिम मुक्ती. त्या अवस्थेत मी आपल्या आजूबाजूला तरंगणाऱ्या हजारो आवाजांपैकी एक होईन. त्या आवाजांपैकी काही एकत्र आले तर एक सुंदर धून तयार होते. त्यामुळे मीही त्या ध्वनिंपैकी एक होईन जो पुढे जाऊन एका सुंदर गाण्याचा सूर बनेल… असं गाणं जे हजारो वर्षं अनेक पिढ्या ऐकतील. निसर्गाशी एकरूप होण्याची हीच खरी मुक्ती मला त्या दुसऱ्या काठावर मिळणार आहे!
आशा भोसले यांच्या या पोस्टमधून काही सूचक अर्थ काढण्यात आले. त्यांच्याबद्दल सांगाव तेवढं थोडेच. असाच एक बहुचर्चित विशेष किस्सा… संगीतकार सुधीर फडके आणि पार्श्वगायिका आशा भोसले ही एक अतिशय जमलेली जोडी आणि याच जोडीचे एक अतिशय लोकप्रिय गाणे दत्तात्रय चित्र या बॅनरखालील राजदत्त दिग्दर्शित “या सुखांनो या” या चित्रपटात होते. या गाण्याचे बोल होते,
या सुखांनो या, एकटी पथ चालले
दोघांस आता हात घ्या, साथ द्या
हे गाणे ग.दि. माडगूळकर यांनी लिहिले होते. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा किस्सा… या चित्रपटाची निर्मिती रमेश देव व सीमाताई यांची होती आणि या गाण्यामुळेच ‌‘गदिमा‌’ आणि सुधीर फडके यांच्यातील उगाच निर्माण झालेला वाद मिटला होता. आता ते पुन्हा एकत्र आले म्हणून आशा भोसलेदेखील आनंदल्या.
रेकॉर्डिंगच्या वेळेस सुधीर फडके अर्थात बाबुजी माडगूळकर यांना म्हणाले, अण्णा आपण उगीचच इतके दिवस भांडत होतो. रमेशचे आभार मानले पाहिजेत. त्याच्यामुळेच आपण पुन्हा एकत्र आलो, पण दुर्दैव असे की ग.दि. माडगूळकर व सुधीर फडके यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला, कारण यानंतर ग.दि. माडगूळकर यांची तब्येत बिघडत बिघडत गेली आणि त्यात त्यांना काम करणे अवघड होऊन गेले. त्यानंतर त्यांचे निधन झाले. १९४८ सालच्या “वंदे मातरम” या चित्रपटाच्या वेळेस ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे सूर जुळले आणि १९७४च्या “या सुखांनो” या चित्रपटांपर्यंत ते
कायम होते.
“या सुखांनो या” हे गाणे रेकॉर्ड झाले आणि प्रथेनुसार मानधन देणे आले. निर्माते म्हणून रमेश देव यांनी आशा भोसले यांना पाच हजार रुपयांचे पाकिट दिले. ते हाती येताच आशा भोसले यांनी सीमाताईना जवळ बोलावले व म्हणाल्या, तुझा हा पहिला पिक्चर. हे तुला माझ्याकडून गुडलक. असे म्हणतच ते पाकिट सीमाताई यांच्या हातात दिले आणि म्हणाल्या, याची साडी घ्यायची नाही. रमेशलाही द्यायचे नाहीत. तो हे पैसे प्रॉडक्सन्समध्ये खर्च करेल. तू याचा दागिना कर…
दोनच वर्षांपूर्वीची गोष्ट. वांद्य्रातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आशा भोसले यांचा आम्हा सिनेपत्रकारांशी संवाद. निमित्त आशा भोसले यांच्या दुबईतील कार्यक्रमाची माहिती देणे. आशाजींसोबत सुदेश भोसले वगैरेही हजर. आशाजींचा उत्साह तरुणांना लाजवणारा. आपण कोणती गाणी गाणार आहोत याबाबत त्या अतिशय मनमोकळेपणाने सांगताहेत. अशातच पूनम धिल्लॉन आपल्या मुलीसोबत येते आणि आशाजी ‌‘यह वादा रहा‌’ या चित्रपटातील ‌‘यह वादा रहा‌’ हे गाणे गुणगुणतात. एक लक्षात रहावा असाच हा लाईव्ह अनुभव. याच वेळेस भेटलेले सुदेश भोसले सांगत होते, आपण अनेक वर्ष गातोय, तर आपल्याला रिहर्सलची गरज नाही असे अजिबात न करता आशाजी आजही पूर्ण रिहर्सल करूनच गायनाच्या कार्यक्रमास सज्ज होतात. त्यांचा उत्साह अतिशय दांडगा असतो, त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. तर वर्षभरापूर्वीच विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‌‘स्वरस्वामिनी आशा‌’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील आशा भोसले यांचे दिलखुलास भाषण असाच एक सुखद अनुभव. आशाजींची प्रचंड ऊर्जा व सकारात्मक दृष्टिकोन कौतुक करावा तेवढा थोडाच. त्यांच्या गायकीसोबतच अन्य अनेक गोष्टी, त्यांचे गुण शिकण्यासारखे आहेत. कलाकार असावा तर असा. कामात चोख, वागण्यात आनंदी. स्वच्छंदी.
अशीच एक साधारण सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीने आपल्या व्यवसाय वृध्दीचा भाग म्हणून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आशा भोसले यांचे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गायन अशा भव्य दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करताच काही दिवसांतच सगळी तिकीटे हाऊसफुल्ल झालीदेखील यात आश्चर्य वाचण्याजोगे काही नव्हतेच. आता कदाचित तुम्हाला वाटेल, इतक्या वर्षांनंतर आशा भोसले यांना अनेक गाणी तोंडपाठ असतील आणि शोच्या वेळी त्या सहज गातील. त्यांनी तसे केले असते तर त्यात काहीच आश्चर्य नव्हतेच, पण आशा भोसले काही वेगळ्याच. त्यांनी सर्वप्रथम कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कोणती मराठी व हिंदी गाणी योग्य ठरतील त्याची तयारी केली. मग वादक आणि अन्य गायकांसोबत रिहर्सल सुरू केली आणि मुंबईजवळच पनवेल येथे असलेल्या या शोच्या स्पॉटची माहिती मिळवली. काही कारणास्तव ती जागा निश्चित करता आली नाही. म्हणून कर्जत येथील विस्तीर्ण अशा एन.डी. स्टुडिओच्या भव्य प्रांगणात, अतिशय मोकळ्या आणि हवेशीर वातावरणात हा शो करायचे ठरले. देश-विदेशातील कधी बंदिस्त, तर कुठे ओपन थिएटरमध्ये आशाजींनी गायनाचे अनेक कार्यक्रम रंगवले, रसिकांना विलक्षण तृप्त केलेले आणि त्यात स्वतःदेखील गायनाचा मनापासून आनंद घेतला.
मला आठवतंय, आम्ही काही पत्रकार मित्रांनी एका गाडीतून वेळेपूर्वीच जाणे पसंत केले. अहो, आशाताई भोसले यांना तीन साडेतीन तास प्रत्यक्षात गाताना ऐकायचे होते ना? बरं त्या ‌‘एक गाणे झाले की दुसरं असे यांत्रिकपणे गात नाहीत‌‘ याची कल्पना होती. ते त्या गाण्याचे व्यक्तिमत्व आपल्या शैलीत साकारतात आणि आपण ज्या नायिकेसाठी पार्श्वगायन केले ती डोळ्यासमोर उभे करणार ही त्यांची खासियत. आशाजींच्या अगदी साडीच्या निवडीपासून त्यांचा टच लक्षात येतो. गाता गाता सहज संवाद साधणे, एकादे मार्मिक मिस्कील वाक्य बोलणं, छान बोलणं हसणं, अर्थपूर्ण पाहणे, सूचक नजर टाकणे असं करत करत कार्यक्रम लाईव्ह ठेवतात तर लवकर जाऊन तशी सगळाच स्टेज दिसेल अशी जागा पटकावणे आवश्यक होतेच. हा कधीच न संपणारा अनुभव घ्यायचा होता. पत्रकारितेने मला असे बरेच चांगले अनुभव दिले. ते तुम्हा रसिकांना सांगण्यात एक आनंद असतो. तुमचा प्रतिनिधी म्हणून मी त्यात वावरत असतो.
एन.डी. स्टुडिओचा छान परिसर, मोकळे आकाश, आणि आशा भोसले एकेका गाण्यासह जुन्या आठवणीत, फ्लॅशबॅकमध्ये नेताहेत असा झक्कास अनुभव. गाण्याच पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येत आहे असा अनुभव. त्या गात असतानाच त्यांनी पार्श्वगायन केलेल्या किमान तीन चार पिढीतील अनेक नायिका, सहनायिका, खलनायिका डोळ्यासमोर येत आहेत असं वाटलं. आशाजींनी मराठीसह चौदा भाषांत गायन केले आहे. गाण्यांची संख्या बारा हजारपेक्षा जास्त आणि त्या प्रत्येक भाषेचा अर्थ, भावार्थ त्यांनी आपल्या गाण्यात परफेक्ट पकडलाय. गाण्याचा आत्मा, स्वभाव , वैशिष्ट्य त्यांनी कायमच महत्त्वाचे मानले. गाण्याचे व्यक्तिमत्व आपल्या गाण्यात उतरवले. पार्श्वगायन कसे असते, असावे, कसे शिकावे, कसे आत्मसात करावे हे आशाजींकडून आवर्जून शिकण्यासारखे.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात “माझा बाळ” या चित्रपटातील ‌‘चला चला नव बाळा‌‘ या गाण्यापासून केली. संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. १९५०च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर सुरय्या, नूरजहा, लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यांना उत्तम मागणी. लता मंगेशकर तर भगिनी.
आशा यांनी मराठीत गायलेल्या गाण्यात संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे गायलेली गाणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. किती नको असं होऊन जाते, सांग तू माझा होशील का? (लाखाची गोष्ट), नाच नाचुनी अती मी दमले, तुला पाहते रे तुला पाहते (जगाच्या पाठीवर), काल मी रघुनंदन पाहिले (सुवासिनी), ही रात चांदण्याची (गरीबाघरची लेक), जो जो गाई कर अंगाई (हा माझा मार्ग एकला), लिंब लोण उतरु कशी (एकटी). आशा भोसले यांनी एका सुधीर फडके यांच्याबद्दल मुलाखतीत म्हटलं, फडकेसाहेबांनी एकदा मला सुनावलं, की सूर सुटला तरी चालेल, पण शब्द चुकता कामा नये. आता दु:ख हा शब्द बघा. गाताना ‌‘दु‌’वर जोर देऊनच शब्द बाहेर आला पाहिजे. गाताना चित्र म्हटलं तर काय होतं? पण नाही तो अगदी जोर लावूनच ‌‘चित्र‌’ असा आलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह. पण यामुळे आशा भोसले यांना मराठी गाण्यात सूर सापडला असे म्हटले जाते. चित्रपट संगीत संस्कृतीचा इतिहास असा खोलवर व अनेक लहान लहान गोष्टींसह आहे.
आशा भोसले यांच्या क्षमतेबद्दल ‌‘खरोखरच शब्द अपुरे पडतात‌’. कोरोनाच्या काळात त्या लोणावळ्याला होत्या, पण आराम करताहेत, छान हवेत रमल्यात, जुन्या आठवणीत रमल्यात असे मुळीच नव्हतेच. ‌‘वय हा त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त एक आकडा आहे‌’. तेव्हाच त्यांनी स्वतः यू ट्यूब चॅनल सुरू केले, त्यात काही जुन्या आठवणी व्यक्त केले, पण नवीन आवाजाला त्यांनी आवाहन केले आणि जगभरातून त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालादेखील. नवीन आवाज त्यांनी ऐकला हा त्यांच्यातील खूप वेगळा गुण आहे. विशेष म्हणजे आजही त्यांना कामाचा कंटाळा नाही. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कट्ट्यावर त्या आल्या तेव्हा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना दोन तास वाट पहावी लागली, पण त्या अजिबात कंटाळल्या नाहीत. अगदी दिवसभर थांबायची आपली तयारी होती, आपल्याला काम करायचेच आहे तर थांबायला काय हरकत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. म्हणून त्या सतत आजच्या पिढीला आपल्या वाटल्या. मै जमाने के साथ चलती हू हे त्यांचे आवडते वाक्य.
आशा भोसले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट गीते झालीच, अन्य भाषेतील चित्रपटांसाठी पाश्वगायन एकीकडे तर दुसरीकडे भावगीते आणि अनेक प्रकारची गैरफिल्मी गाणी, पण त्यानी मोजून मापून काम केले आहे अथवा नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्या गायल्या/गातात असे अजिबात नाही. ती त्यांची वृत्ती नव्हती .आपल्या कामाचा भरभरून आनंद घेत इतरांनाही तो द्यावा अशा मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या त्या होत्या. अतिशय गप्पिष्ट असा त्यांचा स्वभाव. एकदा त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीचा योग आला असता. त्यानी सांगितलेल्या गोष्टींतील काही आवर्जून सांगतो,
फार पूर्वी एकेका चित्रपटाचे एकेका गाण्याचे रेकॉर्डिंग म्हणजे खूप मोठा आणि प्रत्येक वेळी वेगळा अनुभव असे. एकेका गाण्यासाठी सिटींग होत, गाण्याची चित्रपटातील जागा, त्या गाण्याचे स्वरुप, कोणावर ते चित्रीत होणार आहे अशा अनेक लहान मोठ्या तपशीलाचा विचार केला जाई, अनेक तास सिटींग चाले, त्यातच अनेक चाली सुचत, विविध कारणास्तव त्या नाकारल्या जात आणि मग एक निश्चित केली जाई. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी त्या चित्रपटातील कलाकार आवर्जून हजर रहात.
आशाच्या आवाजात विविधता आहे. विविध ढंगांच्या गीतांना त्या योग्य न्याय देत. गायिका जरी एक असली, तिचा गळा जरी तोच असला, तरी नानाविध स्वरांची किमया आशा भोसले सहज करून दाखवत.
प्रसिद्ध कलाकार, गायक दीनानाथ मंगेशकरांची ही तृतीय कन्या. लता मंगेशकरची धाकटी भगिनी. आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना घरातच संगीताचा सहवास लाभला. दीनानाथांचा रियाज चाले. वडिलांचा नाट्य संगीताचा वारसा त्यांनी पुढे चालवला. आशा भोसले लहानपणी सतत लता मंगेशकर यांच्याकडे असत. चार मुली, एक मुलगा, पत्नी असा सुरळीत संसार असतानाच २४ एप्रिल १९४२ रोजी दीनानाथा मंगेशकर यांचे अकस्मात निधन झाले अन्‌‍ संसाराची सर्व जबाबदारी १३ वर्षांच्या लता मंगेशकर यांच्याकडे आली. मग हालअपेष्टा सुरु झाल्या. लता मंगेशकर मास्टर विनायकांकडे तसेच चित्रपटात छोटी मोठी कामे करून कुटुंबाचा खर्च भागवत होत्या. छोट्या आशाने डॉक्टर व्हावे ही तिची इच्छा होती.
त्यावेळी मंगेशकर कुटुंबीय मुंबईत वास्तव्यासाठी आले होते. लता मंगेशकर मुंबईतील फेमस स्टुडिओ, फेमस रेकार्डिग स्टुडिओ, फिल्म सेंटर इत्यादी ठिकाणी
वाऱ्या करून भावंडांचे पालनपोषण करत होत्या. त्यावेळी सर्व जण ताडदेवला राहात असत. एके दिवशी त्यांचे शेजारी भोसले नावाचा रेशनिंग इन्स्पेक्टर राहायला आले, आशा त्याच्या अधिक जवळ आल्या आणि प्रेम विवाह करून आशा ‘भोसले’ झाल्या. हे सगळे अचानक झाले. अनपेक्षित होते. १४ वर्षांची आशा एकदम प्रौढा झाली. माहेरशी संबंध तुटला, कारण त्यानी घरच्या मंडळींच्या मर्जीविरुध्द, इच्छेविरुद्ध विवाह केला होता. पतीच्या आग्रहामुळे त्यांना काही काळ चित्रपटसृष्टीत पडावे लागले. त्यांना तसे या क्षेत्राचे फार आकर्षण नव्हते. बालपणी मास्टर विनायक निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित प्रफुल्ल चित्र या संस्थेच्या ‘माझं बाळ’ (१९४३) या चित्रपटात त्यांनी लता मंगेशकराबरोबर छोटीशी भूमिका केली होती. सुरुवातीला नाखुषी पत्करलेल्या पेशात त्यांना मग गोडी वाटू लागली, पण तशी संधीदेखील मिळायला हवी. त्यासाठी त्यांना खस्ता खाव्या लागत.
आशा भोसले यांनी पार्श्वगायिका होण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे त्या संगीत साधनेत रमून गेल्या. अगदी अखेरपर्यंत त्या रियाज करीत. मग वेळ कोणतीही असू देत. त्याचा त्यांना कंटाळा येत नसे. १९४८ साली संगीतकार हंसराज बहल यांनी ‘चुनरिया” या चित्रपटात त्यांच्या आवाजाचा उपयोग, केला. गाणे होते सावन आया रे. सुरुवातीच्या काळात त्यांना मराठी व हिंदी चित्रपटात गाण्याची फारशी संधी मिळाली नाही. हे काहीसं निराशाजनक होते. पण आशा भोसले यांनी संयम ठेवला.
१९४७ ते ५४मध्ये आशा भोसले यांनी संघर्ष केला. पहिला मुलगा दोन महिन्यांचा असताना आपल्या मुलाला घरी ठेवून ध्वनिमुद्रणासाठी जावं लागतं असे. आई म्हणून हे अस्वस्थ करणारे असे. १९५१मध्ये ‘आसमान’ या चित्रपटाद्वारे ओ.पी. नय्यर या वेगळ्या शैलीतील संगीतकाराचा उदय’ झाला. ओ.पी. नय्यर यांना ‘रात की रानी’ या चित्रपटातील जल जल गिरे है परवाने हे आशा भोसले यांचे गीत फारच आवडले बेहद्द होते. त्यांनी छम छमा छम या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गाणे ध्वनिमुद्रित केले. त्यानंतर बी.आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित ‘ नया दौर'(१९५७)मधील साथी हात बढाना, माँगके साथ तुम्हारा, ऊडे जब जब जुल्फे ही या जोडीची गाणी लोकप्रिय झाली आणि ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. पडद्यावर ही गाणी दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांनी खुलवली हेदेखील महत्त्वाचे असते.
‘नया दौर’नंतर तुमसा नही देखा, कैदी, हावडा ब्रिज, फागुन, रागिणी, सोनेकी चिडीयों, दो उस्ताद, बसंत, कल्पना, काश्मीर की कली, एक दुधौफीर एक हसीना, मेरे सनम ते अगदी १९७४च्या प्राण जाए पर वचन न जाए पर्यंत अनेक चित्रपटासाठी संगीतकार ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले ही जोडी जमली आणि हिंदी चित्रपट संगीतात वेगळे पर्व रुजले.
ओ.पी. नय्यर यांच्या अगोदर अरुण कुमार, अल्लारखॉ, विनोद, गुलाम महंमद, सज्जाद हुसेन यांनी आशा भोसले यांना संधी दिली होती. ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांच्या जोडीची काही गाणी अशी… कुछ तो ऐसी बात (कैदी), पिया पिया ना लागे (फागुन), आइये मेहरबाँ (हावडा बीज), छोटासा बालमा (रागिनी), जादुगार साँवरया (अकेकी मलमल), रेशमी सलवार कुडता (नया दौर), ये है रेशमी (मेरे सनम). त्यातच संगीतकार सी. रामचंद्र यांनी बारिशसाठी आशा भोसले यांच्याकडून मिस्टर जॉन बाबाखान हे गीत गाऊन घेतले. पाश्चिमात्य संगीतातील गायिकीला आवश्यक असणारा सूर आशा भोसले यांनी अचूक पकडला. हे गाणे लोकप्रिय झाले आणि पाश्चिमात्य सुरावटीसाठी आशा भोसले यांच्या आवाजाचा वापर सुरु झाला. ते त्यांचे खास वैशिष्ट्य ठरले, इना मिना डिका (आशा), दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण), हंगामा हो गया (अनहोनी), जवानी जाने मन (नमक हलाल), डिस्को स्टेशन (हाथकडी), पिया तो अबतो आजा (कारवाँ), जाने ना (सनम तेरी कसम) अशा कितीतरी गाण्यात आशा भोसले यांचा पाश्चात्य ढग दिसतो.
आशा भोसले यांनी आपल्या पार्श्वगायनात केवढी तरी विविधता दाखवून आपले वेगळेपण अधोरेखित केले. काली घटा छाये मोरा (सुजाता), जबासे ये कहे दो (बैंक मॅनेजर), दिल की कहानी रंग लायी है (लौथवी का चाँद), दिल शामसे डुबा जाता है (संस्कार), दिल लगाकर हम ये समझे (जिंदगी और मौत), नजर लागी राजा (काला पानी), रेशमी सलवार कुडता (नया दौर), पान खाये सैया (तिसरी कसम), नत्रे मुत्रे बच्चे तेरी मुठ्ठीमे क्या है (बूट पॉलिश), गोरे गरि हातोमे (परिणीता), चाँद जहाँ (शारदा), सपनों की डोर बंधी पलकों का पलना (घरसंसार), ऐ गमे दिल क्या करु (ठोकर), तोरा मन बहा पापी (गंगा जमना), सी ए टी कैंट (दिल्ली का ठग), इतनी बडी महफिल और तू (दिल अपना और प्रित पराई), निगाहे मिलाने को जी (दिल ही तो है) ,जब छाये मेरा जादू (लुटमार), दिल चीज क्या है मेरी जान लिजिए, इन आँखो की मस्ती के (उमराव जान), मेरा कुछ सामान (इजाजत), तनहा तनहा यहाँ पे जिना (रंगीला), जरासा झुम लू मै (दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे)वगैरे वगैरे अनेक गाणी.
आशा भोसले यांनी विविध गायकांबरोबर उत्तम साथ केली आहे. प्यार पर बस तो नहीं (तलत बरोबर सोनेकी चिडीयाँ), वो सुब हा कभी तो आयेगी (मुकेश बरोबर फिर सुबह होगी), हाल कैसा है जनाब का (किशोर बरोबर चलतिका नाम गाडी) आँखोको जरा लहरादे आँखोमें आँखे मत्रा हे बरोबर कभी अंधेरा कभी उजाला), मोहम्मद रफीबरोबरची त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली आणि आजही ती गाणी लोकप्रिय आहेत. रात सर्व सर्द है (जाली नोट), बेहीपितीयार होके (जॉनी वॉकर), जब लिया हातमे हात (वचन), झुमती है नजर (हातीमतभाई), दीवाना मस्ताना हुआ (बंबई का बाबू), मै सोया अखियाँ मिटे (फागुन), रात भरका है (सोनेकी विडीयाँ), सरपर टोपी (तुमसा नही देखा), देखकर तेरी नजर (हावडा ब्रिज), ओ मेरे सोनारे सोना ,ओ हसिना जुल्फ़ोवाली (तिसरी मंझिल)….ही गाणी अशी आणखी आहेत,
आज कुणीतरी यावे, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ नां, जीवलगा कधी रे येशील तू , तोरा मन दर्पन कहलाये, खाली हात श्याम आई है,दिल अभी भरा नहीं…
आशा भोसले यांच्याबद्दल सांगाव तेवढं थोडेच. आणखी एक वेगळी गोष्ट, सतिश रणदिवे यांनी दिग्दर्शन केलेल्या लोकराजा राजर्षि शाहू मालिकेसाठी आशा भोसले यांनी एक गाणे गायले होते. पठ्ठे बापूराव व पवळा यांची ती लावणी होती. ती शाहूमहाराजासमोर पेश झाली या ऐतिहासिक प्रसंगाचे ते गाणे होते. विशेष म्हणजे या गाण्याचे आशाताईनी काहीच मानधन स्वीकारले नाही. केवळ शाहूकार्याच्या प्रेमापोटी… आशा भोसले अशी गाणी, अशा अनेक गोष्टी यातून आपल्यासोबत कायम असतीलच…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल

५४ विद्यार्थ्यांना ९५%पेक्षा अधिक गुण पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घोषित केलेल्या …

Leave a Reply