पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात सदस्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.
माथेरानमध्ये हातरिक्षाचालकांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट २०२५ रोजी दिला होता, मात्र या निर्णयाला अनेक महिने उलटूनही अद्याप ९४पैकी ७४ हातरिक्षा चालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासकीय दिरंगाई, स्थानिक सनियंत्रण समितीकडून रिक्षांची संख्या निश्चित करण्यास होणारा विलंब तसेच या प्रकरणात होत असलेल्या कथित राजकीय द्वेषाला कंटाळून अखेर श्रमिक रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी यापूर्वी संघटनेच्या काही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यानंतर बुधवारी अक्षय सपकाळ, मनोज रेनोसे, अफजल डोंगरे, संतोष निचिंदे, अली डोंगरे, अरफाद शेख आणि शहजाद शेख या आणखी सात सदस्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे भाजपचे कमळ हाती घेतले.
या पक्षप्रवेशावेळी माथेरान भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक प्रवीण सपकाळ, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, प्रदीप घावरे, राजेश चौधरी, राकेश चौधरी, दीपक शहा, दिनेश सुतार, झहुर चिपाडे, भारत कारंडे आदी उपस्थित होते. नव्याने झालेल्या पक्षप्रवेशामुळे माथेरानमधील हातरिक्षाचालकांच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे.
Check Also
पत्रकारांसाठी लोणावळ्यात फाईव्हस्टार दर्जाचे विश्रामधाम साकार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या लोणावळा …
RamPrahar – The Panvel Daily Paper