मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करताना आता तुमचा जवळपास पाऊण तासांचा वेळ वाचणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रसेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजेच 31 मे पासून एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस फक्त 2 तास 35 मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करणार आहे. याआधी इंटरसिटीला मुंबई ते पुणे प्रवासासाठी 3 तास 17 मिनिटांचा वेळ लागत होता.
याचं मुख्य कारण म्हणजे इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश अॅण्ड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली असल्यानेच सात दिवसांसाठी चाचणी तत्त्वावर इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. 31 मे ते 6 जून दरम्यान इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. यादरम्यान जर कोणतीही अडचण न येता इंटरसिटी वेळापत्रकानुसार धावली आणि सर्व काही सुरळीत चाललं तर हेच वेळापत्रक कायम ठेवलं जाणार आहे.