Breaking News

पायल तडवी आत्महत्येचा तपास गुन्हे शाखेकडे

मुंबई ः प्रतिनिधी

नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. डॉ. पायल तडवी हिनं बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

डॉ. पायलच्या शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्या नसून हत्या आहे असा युक्तिवाद तिच्या वकिलांकडून करण्यात आला होता. त्यामुळे आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी बुधवारी केली होती. डॉ. पायलच्या कुटुंबीयांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने रॅगिंगविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. आजवर केवळ विद्यापीठ अनुदान आयोग आणि समतुल्य संस्थांच्या निर्देशांवर चालविले जाणारे रॅगिंग विरोधाचे कार्य आणखी गतिमान करण्यासाठी विद्यमान कायद्यातील कच्चे दुवे शोधून आता सरकार त्या ठिकाणी दुरुस्ती करणार आहे. त्यादृष्टीने युद्धपातळीवर बैठकांनाही सुरुवात झाली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply