रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे आंबेपूर मुख्य रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रतिवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम विविध ठिकाणी राबविण्यात येतो. यावर्षी अलिबाग तालुक्यातील चौल ते वावे रस्त्याच्या दरम्यान असलेल्या आंबेपूर गावाच्या मुख्य रस्त्यालगत रेवदंडा ज्येष्ठांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या वृक्षारोपण कार्यक्रमास रेवदंडा ज्येष्ठ नागरिकांच्या सदस्यांसह येथील ग्रामस्थांनीसुध्दा सहभागी होऊन श्रमदानातून वृक्षारोपणाचा आनंद घेतला. या वेळी पर्यावरणपूरक अशी जांभूळ, काजू, बोर, चिंच, गुलमोहर, करंज आदी वृक्ष रोपटे रोपवाटिकेमार्फत ज्येष्ठांचे सदस्य घाडगे व नाईक यांनी उपलब्ध केली होती. या वृक्षारोपण कार्यक्रमाला पावसाने हजेरी लावली, तरीही ज्येष्ठांनी श्रमदानातून ठिकठिकाणी आंबेपूर परिसरात वृक्षारोपण केले. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस, पदाधिकारी आत्माराम आपटे, चंद्रकांत झावरे, विलास घोसाळकर, तसेच स्थानिक रहिवासी प्रवीण घरत यांनी उपस्थितांना वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले, तसेच वातावरणातील दुष्परिणाम टाळण्यासाठी झाडे लावणे किती गरजेचे आहे याचे स्पष्टीकरण केले. येथील रहिवासी प्रवीण घरत यांनी वृक्षारोपण कार्यक्रमानंतर उपस्थित ज्येष्ठांचा पाहुणचार केला.