नवी मुंबई ः प्रतिनिधी : वाशी सेक्टर- 9 येथील जे. एन. टाईप सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींवर शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी माहितीच्या मुद्यावर सभागृहात निवेदन करून तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून सदर कारवाईला तत्काळ स्थगिती मिळविली होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी आज वाशी येथील धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांची प्रत्यक्ष भेट घेतली. कारवाई करण्यात आलेल्या इमारतींचे नळ व वीज जोडणी कापण्यात आल्याने रहिवाशांचा रोष अनावर झाला असता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्वरित अधिकार्यांना फोनवर संपर्क साधत सदर सोसायट्यांच्या पाणी पुरवठा व वीज सुरळीत करण्याच्या सूचना करताच एक तासात त्यांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. या वेळी उपस्थित महिला, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक रहिवाशांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
या वेळी भाजपा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच असंख्य रहिवासी उपस्थित होते.