उरण ः प्रतिनिधी : विजेच्या लपंडावाने संपूर्ण उरण तालुक्याला अक्षरशः हैराण केले असून, पाऊस पडत नसल्याने उष्ण हवामानाने नागरिकांची झोप उडाली आहे. सतत आठ दिवस विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनता उष्म्याने होरपळून निघत आहे. त्यातच अधूनमधून वीजपुरवठा पूर्ववत होत असतानाच अचानकपणे उरण-बोरी नाका येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी उरणच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
नागरिकांचा संताप अनावर झाल्यामुळे बोरी येथील सर्वच नागरिक व महिला कोटनाका येथील महावितरण कार्यालयावर धडकल्या, मात्र या संतापजनक परिस्थितीत नागरिकांचा मोठा जमाव कार्यालयासमोर दाखल झाला असतानाही महावितरणचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर हजर नव्हता. पहाटे तीन वाजेपर्यंत महावितरणचे अधिकारी कार्यालयात येईपर्यंत आलेले सर्वच नागरिक या ठिकाणी थांबून राहिले होते. मोठा जमाव झाल्याने कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचाही फौजफाटा तातडीने मागविण्यात आला होता.
मात्र महावितरणचे पनवेल विभागीय कार्यकारी अभियंता राठोड यांच्या समवेत मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे, बोरी येथील नगरसेवक अतुल ठाकूर व कामगार नेते आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्याशी मोबाईलवरून चर्चेअंती बोरी येथील नागरिकांसाठी उद्या सकाळी तातडीने वाशी येथून नवीन ट्रान्सफार्मर पाठवतो, अशा आश्वासनानंतर नागरिकांचा संतापलेला जमाव शांत झाला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सहकार्याची भूमिका बजावली.
या वेळी सर्व नागरिकांनी सतत वीज जात असल्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणच्या संबंधित अधिकार्यांची असेल, अशा आशयाचे पत्र नगरसेवक अतुल ठाकूर, कामगार नेते संतोष पवार आणि उपस्थित सर्व नागरिकांनी पोलिसांना दिले.
त्यानुसार वीज महावितरणने शनिवारी (दि. 22) दुपारी या परिसरात नवीन ट्रान्सफार्मर बसवला. या वेळी नगरसेवक अतुल ठाकूर, संतोष पवार, हर्षल समेळ तसेच बोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.