अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत वयाची चाळिशी उलटल्यानंतरच हा आजार आढळून येत असे. परंतु आता मात्र विशीतील तरुणांमध्ये देखील मधुमेह आढळतो. बायपासची शस्त्रक्रिया करणे भाग पडणार्या सुमारे 60 टक्के रुग्णांमध्ये त्याच्या मुळाशी डायबिटिस हे कारण असते. महानगरांमध्ये तर 60 च्या पुढे वय असणार्यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये मधुमेह आढळतो. रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण 7 टक्क्यांवर असले तरी डॉक्टर डायबेटिस नियंत्रणाखाली असल्याचे सांगतात. परंतु तसे ते राखणेही ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना जमत नाही.
सध्या चीन ही जगाची डायबेटिस अर्थात मधुमेह राजधानी असली तरी 2045 पर्यंत भारत मधुमेहाच्या रुग्णांच्या बाबतीत चीनलाही मागे टाकेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. 2017च्या आकडेवारीनुसार भारतात 72 कोटी 90 लाख लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. परंतु 2045 पर्यंत भारतातील डायबेटिसच्या रुग्णांची संख्या वाढून 134 कोटी 30 लाख इतकी होणार असल्याचे भाकित तज्ज्ञांनी केले आहे. चीनमध्ये सध्या 114 कोटी 40 लाख लोक मधुमेहाचे रुग्ण असून 2045 मध्ये मात्र चीनमधील 119 कोटी 80 लाख लोकांनाच हा आजार असेल. अर्थात भारतातला डायबेटिस वेगाने वाढत असल्याचे तर चीन मात्र त्याच्यावर प्रभावीरित्या नियंत्रण मिळवणार असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. भारतातली परिस्थिती अधिक भयावह असल्याचे आणखी एका अहवालात नुकतेच उघडकीस आले आहे. एका औषधकंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात खालच्या सामाजिक-आर्थिक स्तरात आता डायबेटिस पसरत चालला आहे. या स्तरात डायबेटिसविषयी तसेच तो कसा नियंत्रित करावा याविषयीची जागरुकता अतिशय कमी असल्यामुळेच रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण बरेच वाढलेले दिसत असून डायबेटिसमुळे गुंतागुंत होण्याचे वयही खाली आलेले दिसत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.2017 मधील आकडेवारीनुसार भारतातील डायबेटिसवरील उपचारांचा एकूण खर्च 63000 कोटी रूपये इतका होता. परंतु समाजाच्या खालच्या स्तरात आता तो पसरत चालल्यामुळे तब्बल 80 टक्के लोकांना सांगितलेले उपचार परवडत नाहीत. एकीकडे हा चिंतेत टाकणारा अहवाल प्रकाशित झालेला असतानाच मुंबईतील पालिका रुग्णालयांमधून पंधरवडाभरापासून मधुमेहाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचेही दिसते आहे. या पालिका रुग्णालयांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील तसेच राज्यभरातून आणि देशभरातूनही रुग्ण उपचारांसाठी येत असतात. तेथे औषधे उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना न परवडणारी औषधे स्वखर्चाने खरेदी करणे भाग पडते आहे. मुळात डायबेटिस हा आजार बैठ्या जीवनशैलीतून उद्भवणारा आहे याची समजच बहुतेकांमध्ये आढळत नाही. शारीरिक हालचालीनुसार प्रमाणित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप अशी जीवनशैली असल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. परंतु धावपळीच्या जीवनशैलीत प्रमाणित आहार आणि व्यायाम शक्य होत नसल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि डायबेटिसचे शुक्लकाष्ठ मागे लागते. त्यात डायबेटिसचा वरकरणी कुठलाही त्रास जाणवत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊन हा आजार बळावतच जातो. डायबेटिस शरीराला आतून पोखरत असतो. त्यामुळे होणारी गुंतागुंत लक्षात येईपर्यंत तो बर्यापैकी बळावलेला असतो. नंतर त्याच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. आता त्याचा फैलाव समाजाच्या खालच्या स्तरात होऊ लागल्याने तर त्या रुग्णांना त्याच्यावर नियंत्रण मिळवणे अधिकच कठीण होणार आहे.