Breaking News

आत्महत्या रोखण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण

पाली : प्रतिनिधी
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले. या काळात अनेकांचे रोजगारदेखील हिरावले, जवळचे नातेवाईक दूर झाले. अशीच परिस्थिती संजय बिस्वास उर्फ संजय बंजारा या तरुणावर आली. त्याने नैराश्यात आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्यानंतर सायकलिंगने त्याला नवचेतना देऊन तारले व आत्महत्येपासून परावृत्त केले. मग हा तरुण आत्महत्या रोखण्याचा संदेश घेऊन सायकलवरून भारतभ्रमणासाठी निघाला आहे.
32 वर्षीय संजय मूळचा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी आहे. 30 ऑगस्ट 2021पासून तो सायकलवरून भारतभ्रमंतीवर निघाला आहे. आतापर्यंत त्याने 11 हजारांहून अधिक किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. कोलकाता, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र-मुंबईवरून प्रवास करीत संजय रायगड जिल्ह्यात दाखल झाला आहे.
संजयचा रेस्टॉरंटचा व्यवसाय अगदी उत्तम चालत होता. मात्र कोरोनामुळे मार्च 2020मध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन लागले. त्यात त्याचा व्यवसाय बंद पडला. आता पुढे काय या विचाराने संजयने स्वतःला तब्बल साडेतीन महिने एका खोलीत कोंडून घेतले. पैसा जवळ नसल्याने हळूहळू जवळचे सर्व नातेवाईक व मित्र त्याला या परिस्थितीत सोडून गेले. या नैराश्यात व एकाकीपणामुळे त्याने आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र दरम्यानच्या काळात त्याला कुणीतरी सांगितले की तू सायकलिंग कर, त्यामुळे तुला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. मग संजय रोज सायकलिंग करू लागला. काही दिवसांनी तो 50 ते 100 किमी सायकलिंग करू लागला आणि त्याचे नैराश्य व एकाकीपण पूर्णपणे गेले. मग मात्र लोकांना आत्महत्येपासून दूर करण्यासाठी त्याने सायकलवरून भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. नैराश्याने व अपयशाने आत्महत्या करू नका हा संदेश घेऊन संजय भारतभर सायकलवरून भ्रमंती करीत आहे. तो जिथे थांबतो तिथे लोकांशी संवाद साधतो. विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शनदेखील करतो.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply