पनवेल ः वार्ताहर
नवी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे विविध आठ गुन्ह्यात जप्त केलेला अंमली पदार्थाचा साठा काही दिवसांपूर्वी तळोजा येथील एका कंपनीत नष्ट करण्यात आला. यात गांजा, ब्राऊन शुगर, चरस, मॅथॅक्युलॅन (एमडी) या अंमली पदार्थांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी युनिट स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली हा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला. या समितीमध्ये सदस्य म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोषी व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम तर सचिव म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बुधवंत हे आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 2016 मध्ये मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी युनिटची स्थापना झाल्यानंतर शहरातील अंमली पदार्थाविरोधातील कारवाईला वेग आला आहे. गेल्या सात वर्षाच्या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पथकासह, खंडणी विरोधी पथक आणि विविध पोलीस ठाण्यांनी नवी मुंबई, पनवेल आदि भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन मोठया प्रमाणात गांजा, ब्राऊन शुगर, चरस, मॅथॅक्युलॅन (एमडी) आदी अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जफ्त करण्यात आलेला अंमली पदार्थाचा साठा हा पूर्वी त्या-त्या पोलीस ठाण्यात मुद्देमाल कक्षात ठेवण्यात येत होता. मात्र आता अंमली पदार्थाचा जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे या कक्षात आता सर्व प्रकारचे अंमली पदार्थ सुरक्षितरित्या साठवून ठेवण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी
यांनी दिली.
दरम्यान, अंमली पदार्थाशी संबधित ज्या गुन्ह्यांचा निकाल लागला आहे, त्याच गुन्ह्यातील अंमली पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करता येतो. तसेच अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी सहपोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीकडूनदेखील सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतरच अंमली पदार्थ नष्ट केले जातात.
नवी मुंबई पोलिसांनी गत सात वर्षामध्ये जप्त केलेल्या मालापैकी एकही अंमली पदार्थ नष्ट केला नव्हता. हा सर्व मुद्देमाल पोलीस मुख्यालयात साठवून ठेवण्यात आला होता. मात्र नुकतेच वाशी पोलीस ठाण्यातंर्गत दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांचा निकाल लागल्याने अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या आठ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अंमली पदार्थाचा साठा नुकताच तळोजा येथील एका कंपनीमध्ये नष्ट करण्यात आला, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बुधवंत यांनी दिली. जसजसे यांसदर्भातील गुह्यांचा निकाल लागेल, तसतसे त्या गुह्यात आढळलेला अंमली पदार्थाचा साठा न्यायालयाच्या निर्देशानुसार नष्ट केला जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुशार दोशी यांनी सांगतले.