Breaking News

भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर ; विंडीजवरील विजयाने गुणतालिकेत दुसर्या स्थानी

मँचेस्टर : वृत्तसंस्था

दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या होत्या, मात्र हे आव्हान विंडीजला पेलवले नाही आणि त्यांचा डाव अवघ्या 143 धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारत 11 गुणांसह संयुक्तपणे दुसर्‍या स्थानी, तसेच उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. दुसरीकडे विंडीजच्या उपांत्य फेरीचा आशा मावळल्या आहेत.

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 268 धावांपर्यंत मजल मारली होती. विराटने 82 चेंडूंत 8 चौकारांसह 72 धावांची, तर धोनीने 61 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. कोहली-धोनी यांच्याबरोबरच हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांचेही उपयुक्त योगदान लाभले. राहुलचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. त्याने 6 चौकार लगावत 68 चेंडूंत 48 धावा केल्या. पांड्याने 38 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 35व्या षटकात 143 धावांवर संपुष्टात आला. विंडीजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. सुनील एम्ब्रिसच्या 31 धावा वगळता इतर एकाही फलंदाज मैदानात जास्त काळ तग धरू शकला नाही.

– विराटचा अर्धशतकी ‘चौकार’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराटने 72 धावांची खेळी केली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील त्याचे हे 53वे अर्धशतक ठरले. याचसोबत विश्वचषक स्पर्धेत चार सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरच्या नावावर एका विश्वचषक स्पर्धेत तीन अर्धशतके जमा आहेत.

– शमीकडूनही चारची भरारी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने चार बळी टिपले. याबरोबरच विश्वचषक स्पर्धेत तीन वेळा चार बळी टिपण्याचा नवा इतिहास त्याने रचला. 2015मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत शमीने एका सामन्यात 35 धावा देत चार गडी बाद केले होते. त्यानंतर त्याने गेल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चार जणांना माघारी धाडले. उमेश यादवनंतर विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामन्यात चार बळी टिपणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply