नागरिकत्व विधेयकावरून फडणवीस यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत या विधेयकाविरोधात संदिग्ध भूमिका घेतली आहे. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने भूमिका बदलली आहे का? भूमिका बदलण्यासाठी शिवसेनेवर काँग्रेसने दबाव टाकला होता का, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेने यू टर्न घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. लोकसभेत सोमवारी (दि. 9) शिवसेनेने विधेयक मांडण्याच्या बाजूने मतदान केले. विधेयक मंजुरीसाठीही मतदान केले आणि आज मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधेयकावरून संदिग्ध भूमिका मांडली. शिवसेनेने रातोरात त्यांची भूमिक बदलली आहे. याचा अर्थ शिवसेनेवर कुणाचा दबाव होता का? राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली का, असा सवाल फडणवीस यांनी केला. मंत्रिमंडळ स्थापन होऊन एवढे दिवस उलटले तरी अद्याप खातेवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे नागपूर अधिवेशनात आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे कोण देणार, असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ खातेवाटप करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे होणारे अधिवेशन केवळ पाच ते सहा दिवस चालणार आहे. किमान दोन आठवडे अधिवेशन सुरू ठेवावे, अशी मागणी आम्ही केली होती, पण आमची मागणी मान्य करण्यात आली नाही, असे सांगतानाच हे अधिवेशन म्हणजे निव्वळ औपचारिकता आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारने अधिवेशनाचे दिवस कमी केले तरी चालतील, पण शेतकर्यांना तातडीने मदत करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका झाल्यावर शेतकर्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली होती, तेवढी तरी मागणी त्यांनी पूर्ण करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.