Breaking News

आयुष्य

तत्कालीन राज्याचे गृहमंत्री कै. आबा उर्फ आर. आर. पाटील यांनी क्लास वन अधिकारी व उच्चशिक्षित तरुणांच्या एका कार्यक्रमात आयुष्यावर भाष्य करणारे मार्गदर्शन केले होते. जीवनाच्या गरजा किती असाव्यात हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत, मात्र त्याचा विस्तार व मिळकतीची मर्यादा यांचीही सांगड घातली पाहिजे. त्यांनी एका उच्च अधिकार्‍याचे उदाहरण देत सांगितले की, सुनील जोशी या क्लास वन अधिकार्‍याच्या घरावर मुंबई पोलिसांनी धाड टाकली. गृहमंत्री म्हणून धाडीचा तपशील मागितला, तर प्रत्येक वेळी उत्तर येत होते की साहेब थोडे थांबा, थोडे थांबा. शेवटी स्कोअर किती एवढे तरी सांगा, तर पलीकडून त्याच मिश्कीलपणे उत्तर आले, साहेब काऊंटिंग सुरू आहे. त्याची संपत्ती मोजायला तब्बल दोन दिवस लागले. त्यामध्ये दोन पेन सापडले. त्यांची किंमत 17 लाख रुपये, तर संडासाच्या भांड्याची किंमत 90 हजार रुपये. असे खूप मोठे घबाड सापडले. आबांनी त्यावर कोटी केली की, त्या अधिकार्‍याला स्वच्छतागृहातच राहायचे होते का? मानवाच्या  गरजा किती, किती आयुष्य जगायचे असते याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे आबांना सुचवायचे होते.

प्रत्येकाची आयुष्य जगण्याची शैली वेगवेगळी असली तरी शेवटी जाताना रिकाम्या हाताने जावे लागते, असा संदर्भ आर. आर. पाटील यांना द्यावयाचा होता. देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या फौजी जवानाचे आयुष्य म्हणजे सदैव दक्ष असावे लागते. सीमेवर लावलेल्या काटेरी कुंपणाच्या

तारेपासून बचाव करायचा असतो. त्याचप्रमाणे दुष्मन सैनिकांच्या गोळीपासूनही बचाव करायचा असतो. स्वकियांच्या अवैध हालचाली व अतिरेक्यांच्या बॉम्बहल्ल्यापासूनही  दूर राहायचे असते. संघर्षाचा ठेकाच सैनिकाने घेतलेला असतो. शेतकरी बांधवाला आयुष्यात मेहनत आणि मेहनतच करावी लागते. पत्रकाराचे जीवन बिनपगारी फुल अधिकारी अशा धाटणीचे असते. जगण्याचा संघर्ष पत्रकाराच्या नशिबालाच आलेला. मानापमान, अवहेलना वाट्याला येतच असतात. कलाकाराचे आयुष्य तर लहरी पावसासारखे. कधी ऊन तर कधी मुसळधार पावसाने सर्वच वाहून जाणारे, ओल्या-सुक्या दुष्काळाची नेहमीच चिंता.

व्यापार्‍यांचे आयुष्य, कवी, शिक्षकांचे, वारकर्‍यांचे, शासकीय अधिकार्‍यांचे, कर्मचार्‍यांचे तसेच पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांचे राहणीमान वेगवेगळ्या साच्यातील असून, आयुष्य जगण्याची शैली वेगवेगळ्या पद्धतीची असते. आयुष्य हे खूप मोठे कोडे आहे. जो वादळाशी झुंज देतो तोच जिंकतो. जीवन आहे त्याला अंतही आहे. मग आपण आयुष्याला दगाबाज का मानायचे. प्रत्येक क्षणाला आयुष्याची साथ असते. सगळेच आपापल्या कार्यात व्यस्त असल्याने कोणाकडेच वेळ शिल्लक नाही. जमाना बदलला आहे. माणसाला माणसाचे मन कळेनासे झाले आहे. समाधानाची भावना नष्ट झाली आहे. प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा वाढल्या आहेत. आपल्याकडे जे आहे ते आपल्याला नकोसे असते. जे हवे असते ते कधी मिळत नाही. जे आवडते ते मिळत नाही आणि आपल्याकडे असते ते आवडत नाही. तरीही अपण जगत असतो. प्रेम करतो. बदलत्या जगाबरोबर बदलून घडलेल्या घटना सहन करायच्या असतात. पंख आल्यावर घरट्याबाहेर पडायचे असते. आकाशात झेपावताना धरतीला विसरायचे नसते. मनावर दडपणाचा ओझा असला तरी हसायचे नसतानाही हसायचे असते. दुःख, अश्रूंना मनात कोंडून ठेवायचे नसते. इच्छा नसतानाही वाकायचे असते. जगचा निरोप घेताना समाधानाने जायचे असते. मरणाच्या दारातही यमाची चेष्टा करायची असते. आयुष्य असेच जगायचे असते.

इतरांना सुख देण्यासाठी आपले सुख विसरायचे असते. यालाच आयुष्य असे संबोधले जाते. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदापोहे. नात्यांच्या या बाजारात विक्रेत्यांची दाटी, रोज रडावे, रोज नटावे, रोजच सजावे. भविष्याच्या अट्टाहासापोटी रोजच जगून मरावे. आयुष्य  हे कढईतले कांदापोहे असे गाणे दुःखी असणारे मनही गुणगुणत असते. आयुष्याचे एका सुभाषितकाराने खूप छान वर्णन केले आहे.

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे, आयुष्यात येऊन माणसे मिळवावी, एकमेकांची सुख-दु:खे एकमेकांना कळवावी, बघायला गेले तर आयुष्यही खूप सोपे असते, जगायला गेले तर दु:खातही सुख असते, चालायला गेले तर निखारेही फुले होतात, तोंड देता आले तर संकटही क्षुल्लक असते, वाटायला गेले तर अश्रूंतही समाधान असते, पचवायला गेले तर अपयशही सोपे असते, हसायला गेले तर रडणेही आपले असते, बघायला गेले तर आयुष्यही खूप सोपे असते. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. अश्रू नसते डोळ्यांमध्ये तर डोळे इतके सुंदर असले नसते. दुःख नसते हृदयात तर धडकत्या हृदयाला काही किंमत उरली नसती. जर पूर्ण झाल्या असत्या मनातील सर्व इच्छा, तर भगवंताची काहीच गरज उरली नसती.

आयुष्य हे एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते. आयुष्य खूप कमी आहे. ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. कधी असेही जगून बघा, कधी तरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करून तर बघा. कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा. कधी असेही जगून बघा. पंख नाहीत मला, पण उडण्याची स्वप्ने मात्र जरूर बघतो.

कमी असले आयुष्य तरी भरभरून जगतो. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो. आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो. आयुष्य थोडेच असावे, पण आपल्या माणसाला ओढ लावणारे असावे, आयुष्य थोडेच जगावे, पण जन्मोजन्मीचे प्रेम मिळावे, प्रेम असे द्यावे की घेणार्‍याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचेही भान नसावे, आयुष्य असे जगावे की मृत्यूनेही म्हणावे, जग अजून, मी येईन नंतर.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply