महाडमध्ये दोन दिवसांत 195 मिमी पावसाची नोंद
महाड : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांत महाड परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मागील चोवीस तासात महाड परिसरात 195 मिमी पावसाची नोंद झाली, तर एकूण पाऊस 360 मिमी झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण निम्मे असले तरी महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने दमदारपणे कोसळणण्यास सुरुवात केल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
सातत्याने पडणार्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी (दि. 28) रात्री केंबुर्ली गावाजवळ नदीकिनारी असलेली संरक्षक भिंत कोसळली. स्थानिक प्रशासनाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेत उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील शेलटोली गावातील प्राथमिक शाळेची एक भिंतदेखील रात्रीच्या सुमारास कोसळली. यामुळे शाळेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या वेळी शाळा बंद होती. तसेच वरंध गावातील विठ्ठल पांडुरंग देशमुख या शेतकर्याची एक म्हैस विजेचा शॉक लागून दगावली आहे. यामुळे या शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. महाड महसूल विभागातील आपत्कालीन पथक सज्ज झाले असल्याची माहिती महाड नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. तर महामार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने एल अॅण्ड टीने हलगर्जीपणा केल्या कारणास्तव या ठेकेदाराला महामार्ग विभागाकडून नोटीस बजावली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.