Breaking News

नाणार प्रकल्पातून जिल्ह्याचा कायापालट होईल

भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे यांचा विश्वास

नागोठणे : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणारचा तेल शुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करून तो रोहे तालुक्यासह इतर तीन तालुक्यांतील 40 गावांमध्ये येत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे या चार तालुक्यांसह संपूर्ण रायगडचा निश्चितच कायापालट होणार असून लाखो नागरिकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे यांनी दिली.

नाणारचा तेल शुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यातील रोहे, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांत येत असून त्यासाठी 40 गावांची जागा या प्रकल्पासाठी घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तीन लाख कोटी रुपये खर्चाच्या या महाकाय तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी सौदी अरेबियाची अराम्को यांच्यासह इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. या प्रकल्पासाठी सिडको जागा उपलब्ध करून देणार आहे. विस्थापित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांना या कंपनीत नोकरी उपलब्ध होणार असून स्थानिकांसह लाखो रायगडवासीयांना रोजगार तसेच व्यवसाय उपलब्ध होणार आहे. नागोठण्यात आयपीसीएल (आताची रिलायन्स) प्रकल्प येत असल्याची घोषणा 1984 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री एन. डी. तिवारी यांनी लोकसभेत केली होती. या घोषणेपूर्वी हा प्रकल्प अलिबाग तालुक्यातील उसर किंवा गुजरात राज्यात नेण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला होता, मात्र हा प्रकल्प नागोठण्यातच होण्यासाठी स्व. बॅ. ए. आर. अंतुले तसेच नागोठण्याचे सुपुत्र, तत्कालीन राज्यपाल राम प्रधान यांनी विशेष प्रयत्न केले होते. या प्रकल्पामुळे नागोठणेसह संपूर्ण विभागाचा कायापालट झाला असून हजारो स्थानिक नागरिकांना नोकरी, व्यवसाय तसेच रोजगार उपलब्ध झाला आहे. एखादा प्रकल्प त्या भागात आल्यानंतर जनतेचे जीवनमान, राहणीमान कसे बदलते याचा प्रत्यक्ष अनुभव येथील जनतेने घेतला आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प आला की त्याला विरोध करणारे नेहमीप्रमाणे तयारच राहत असले तरी स्थानिक जनतेने त्यांच्या विरोधाला साथ न देता आपल्या भल्यासाठी प्रकल्पाचे स्वागत करून मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन प्रकाश मोरे यांनी या वेळी केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply