रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी
‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह पंचायत समित्या, एकात्मिक बालविकास प्रकल्प, अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायती, पशुवैद्यकीय दवाखाने व इतर इमारतींचा समावेश आहे.
या इमारतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सोयीसुविधा पुरविण्यात येतात, मात्र काही इमारतींमध्ये अखंडित वीजपुरवठा होत नाही. विशेषतः अंगणवाड्यांमध्ये अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने गरोदर महिला, स्तनदा माता, बालके, ज्येष्ठ व गरजू रुग्णांना सेवा देण्यात ग्रामीण यंत्रणेमध्ये अनेक अडचणी येतात.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व इमारतींचे ऊर्जा विकास अभिकरणामार्फत सर्वेक्षण करून जास्तीत जास्त इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा स्थापित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आली आहे.