कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या खालून वाहणारा नाला तेथे असलेल्या बिल्डरने बंद केला असल्याने ग्रामस्थांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, उमरोली ग्रामपंचायतीने हा नैसर्गिक नाला तात्काळ सुरू करण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी मागणी डिकसळ ग्रामस्थांनी कर्जतच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जत बाजूकडे डिकसळ हे गाव रेल्वे मार्गाला लागून आहे. पुढे अनेक गावे असून त्यांचा लोकल प्रवास हा भिवपुरी रोड स्टेशन वरून होत असतो. परिसरातील जमीन विकसित करणार्या बिल्डरने तेथे असलेला नैसर्गिक नाला बंद केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पाणी येथील रस्त्यात साचून राहत आहे. रस्त्यात पाणी भरल्याने सर्व प्रवासी जीव मुठीत घेऊन रेल्वे मार्गातून चालत जावून स्टेशन गाठत आहेत. पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला बंद केल्याने निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता डिकसळ ग्रामस्थांनी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन सादर केले आहे. तर उमरोली ग्रामपंचायतीनेदेखील बिल्डरला पत्र दिले आहे. सरपंच सुनीता बुंधाटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाण्याखाली गेलेल्या परिसराची पाहणी केली. माजी सरपंच पाटील, उपसरपंच गायकवाड, माजी उपसरपंच दिनेश भासे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, रेल्वेने पुर्वीचा नाला खुला करावा आणि प्रवाशांना स्थानकात येताना रूळ ओलांडून यावे लागू नये, यासाठी प्रयत्न करावेत, आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे किशोर गायकवाड यांनी केले आहे.