उरण : वार्ताहर – जोरदार पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील, तसेच नदीतील मासे शेतातील साठलेल्या पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. या वेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच वलगणीचे मासे असे म्हणतात. वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशात अंडी (गाबोळी) हमखास असतात. त्यांना स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोलीवाले मासे असे म्हणतात. ही गाबोळी (अंडी) खवय्ये अतिशय ताव मारून खातात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. मच्छीच्या अंड्यांना तळून किंवा कालवण करून खातात. वलगणीचे मासे पकडण्यासाठी जाळे, पाग, लोखंडी तलवार आदी साधनांचा वापर करतात. दरवर्षी खाडीलगतचे नागरिक मासे पकडण्यासाठी जातात. खूप प्रमाणात मासे मिळतात. ही मजा काही औरच असते. या वलगणीत चिवणी मासे खायला स्वादिष्ट लागतात, असे खावय्यांचे मत आहे.
वलगणीचे मासे हे प्रमुख्याने पोटात अंडी असलेले असतात. पोटात अंडी असलेले मासे चविष्ट असतात. त्यांची अंडीदेखील खवय्ये मोठ्या चवीने खातात. कारण नंतर वर्षभर त्यांना त्याचा स्वाद घेता येत नाही, असे मासे बाजारात उपलब्ध असल्याने खवय्यांना मोठी मेजवानी मिळत आहे. आता भरावामुळे मासे कमी मिळू लागले आहेत.
पूर्वी भराव नव्हते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मासे मिळत असत. उरण तालुक्यात वलगणीच्या माशांच्या प्रमाणात फारच घट पडलेली दिसत आहे. उरण परिसरात खाड्यांवर झालेले भराव, काही ठिकाणी प्रदूषण झाल्याने आवक कमी झाली आहे. पाणजे, फुंडे, बोकडविरा, खोपटा चिरनेर, कोप्रोली आदी ठिकाणी मिळणार्या वलगणीचे मासे कमी झाले आहेत. माशांचे प्रमाण कमी झाल्याने मासेही महाग झाले आहेत. दिवसेंदिवस वालगणीचे मासे दुर्मिळ होऊ लागले आहेत, असे पाणजे गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर रामभाऊ पाटील यांनी सांगितले.